बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात कोंबडय़ा सोडल्या

करोनामुळे अनेक व्यवसायात मंदी आली. याचा परिणाम कुक्कुटपालन करणाऱ्या शेतकऱ्यांवर झाला आहे. आपत्ती समजून पोल्ट्री फार्मधारकांना शासनाने अनुदान द्यावे, या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी ‘कोंबडय़ा फेको’ आंदोलन करण्यात आले. घोषणाबाजी करून जिल्हाधिकारी कार्यालयात कोंबडय़ा सोडण्यात आल्या. याप्रकरणी पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध केले.

करोना आजाराची लागण चिकन खाण्यातून होते, अशी अफवा पसरल्यामुळे अनेकांनी ते खाणे बंद केले. परिणामी, १० रुपयाला एक कोंबडीही कोणी घेत नसल्यामुळे कुक्कुटपालन करणाऱ्या अनेक शेतकरी मोठय़ा प्रमाणात आर्थिक अडचणीत आले. पोल्ट्रीधारकांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. त्यामुळे पोल्ट्रीधारकांना शासनाने अनुदान द्यावे, या प्रमुख मागणीसाठी ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेच्यावतीने बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘कोंबडय़ा फेको’ आंदोलन करण्यात आले.

कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शासनाविरुद्ध घोषणाबाजी करून कोंबडय़ा सोडल्या. अचानक झालेल्या आंदोलनामुळे प्रशासन ही हादरले होते. यावेळी पोलिसांनी स्थानबद्ध केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *