पती शिजवत होता मानवी हाताचे तुकडे, पत्नीची पोलीस ठाण्यात धाव

आठवडा बाजारातून सामानाची खरेदी करुन पत्नी घरी परतली. त्यावेळी समोर पतीला पाहून तिला आनंद झाला. कारण नेहमीच्या वेळेपक्षा पती लवकर घरी आला होता. तो रात्रीच्या जेवणाची तयारी करत होता. पती जेवण बनवतोय म्हणून तिला मनातून आनंदही झाला. पण तो क्षणिक ठरला. कारण ज्या भांडयामध्ये तो अन्न शिजवत होता ते पाहिल्यानंतर तिला धक्का बसला, ती अस्वस्थ झाली. त्या भांडयामध्ये मानवी हाताचे तुकडे होते. बिजनोरच्या टिक्कोपूर गावामध्ये ही धक्कादायक घटना घडली. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

शिजवण्यासाठी कुठून आणला हात?
संजय असे या महिलेच्या पतीचे नाव आहे. दारुच्या नशेमध्ये असलेला संजय जवळच्या स्मशानभूमीत गेला. तिथे त्याने एक पिशवीमध्ये मांस व अर्धवट जळालेले मानवी अवयवाचे तुकडे भरले. पत्नीने घरामध्ये प्रवेश केला, त्यावेळी तो पॅनवरती हे मांस शिजवत होता. ते दृश्य पाहून हादरुन गेलेली महिला थेट घराबाहेर पळाली व शेजाऱ्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.

शेजाऱ्यांनी संजयला पोलिस येईपर्यंत घरामध्येच बंद करुन ठेवले. संजयने काही दिवसांपूर्वी त्याच्या वडिलांवरही हल्ला केला होता अशी माहिती पोलिस तपासातून समोर आली आहे. तो स्मशानभूमीतून हा हात घेऊन आला होता. या प्रकरणाची कसून चौकशी सुरु आहे असे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. संजयला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गंगेच्या किनाऱ्यावरुन तो हे मांस घेऊन आला होता. तिथे मानवी मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात. नवऱ्याचे हे वर्तन पाहून पत्नीला जबर मानसिक धक्का बसला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *