पेट्रोल आणि डिझेल दर कपात कायम

आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात खनिज तेलाच्या किंमतीमधील घसरणीचा लाभ भारतीयांना होत आहे. खनिज तेल स्वस्त झाल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी सोमवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात केली. पेट्रोल २२ ते २३ पैसे आणि डिझेल प्रती लीटर २० ते २१ पैशांची घट झाली. यामुळे मुंबईत पेट्रोल दर प्रति लीटर ७४.१६ रुपये आणि डिझेल दर ६६.४३ रुपये झाला आहे.

आंतरराष्ट्रीय कमॉडिटी बाजारात खनिज तेलाच्या किंमतीमधील घसरण कायम आहे. सोमवारी खनिज तेलाचा भाव (ब्रेंट क्रूड) ५१ डॉलर प्रति बॅरल होता. तत्पूर्वी तो ४८.४० डॉलरच्या नीचांकी स्तरावर घसरला होता. जुलै २०१७ नंतरची ही त्याची नीचांकी पातळी होती. चीनमधील ‘करोना’ विषाणूमुळे खनिज तेलाच्या मागणीवर मोठा परिणाम झाला आहे. जगभरातील तेलाची मागणी घटल्याने मागील दोन महिन्यात तेलाच्या किमती १० ते १५ डॉलर्सने कमी झाल्या आहेत. तर मागील आठवडाभरात खनिज तेलाच्या किमतीत ११ टक्क्यांची घट झाली आहे. यामुळे खनिज तेल उत्पादक देश धास्तावले आहेत. तेलाच्या किंमतीमधील घसरण रोखण्यासाठी त्यांच्याकडून उत्पादन कपात करण्यात आली आहे. मात्र तेलाच्या किंमतींमधील घसरण कायम आहे. दरम्यान गेले तीन दिवस देशांतर्गत पेट्रोलियम कंपन्यांनी आज पेट्रोल दरात २२ ते २३ पैसे आणि डिझेल प्रती लीटर २० ते २१ पैशांची कपात केली. यामुळे पेट्रोलचा भाव ५ महिन्यांच्या नीचांकावर तर डिझेलचा भाव ७ महिन्यांच्या नीचांकावर आला आहे. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीनुसार जागतिक बाजारपेठेतील खनिज तेलाची घटलेली मागणी ही दशकभरातील सर्वात कमी मागणी आहे. रविवारी पेट्रोल आणि डिझेल अनुक्रमे १७ पैसे आणि २१ पैशांनी स्वस्त झालं होतं.

प्रमुख शहरांमधील इंधन दर

शहर पेट्रोल डिझेल
मुंबई ७४.१६ ६६.४३
नवी दिल्ली ७१.४९ ६४.१०
चेन्नई ७४.२८ ६७.६५
कोलकाता ७४.१६ ६६.४३
बंगळुरु ७३.९४ ६६.२९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *