शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमला दणका; नगरसेवक पद रद्द

महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारा अहमदनगर महापालिकेचा माजी उपमहापौर व विद्यमान अपक्ष नगरसेवक श्रीपाद छिंदम (Shripad Chindam) याला राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं जोरदार दणका दिला आहे. छिंदम याचं नगरसेवक पद रद्द करण्यात आलं आहे.

अहमदनगर महापालिकेचा उपमहापौर असताना छिंदम यानं महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरून बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अत्यंत अपमानास्पद शब्द वापरले होते. संबंधित कर्मचाऱ्यानं रेकॉर्ड केलेलं हे संभाषण व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती. छिंदम याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याला तडीपारही करण्यात आलं होतं. भाजपनं त्याच्यावर कारवाई करून त्याची पक्षातूनही हकालपट्टी केली होती.

मागील महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवून तो पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आला होता. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून त्यानं प्रायश्चित्तही घेतलं होतं. अर्थात, त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आधीच्या महापालिका सभागृहानं छिंदम याचं नगरसेवकपद रद्द करण्याचा ठराव केला होता.

हा ठराव विचारार्थ राज्य सरकारकडं पाठवण्यात आला होता. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दालनात आज त्यावर सुनावणी झाली आणि छिंदम याचं नगरसेवक पद रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *