कुत्र्याच्या ओरडण्याच्या त्रास होतो म्हणून केलेल्या मारहाणीत महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवलीत हा प्रकार घडला आहे. पाळीव कुत्र्याच्या ओरडण्याचा त्रास होतो म्हणून शेजाऱ्यांकडूनच महिलेला मारहाण करण्यात आली होती. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची दखल घेतली असून गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
डोंबिवलीमधील मानपाडा रोड येथे एका चाळीत ही घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या नागम्मा शेट्टी यांच्याकडे पाळीव कुत्रा होता. या पाळीव कुत्र्याच्या ओरडण्याचा आम्हाला सतत त्रास होतो अशी शेजाऱ्यांची तक्रार होती. यावरुनच सोमवारी नागम्मा यांच्यासोबत शेजाऱ्यांना वाद घातला. यावेळी वाद वाढल्यानंतर शेजारी राहणाऱ्या महिलांना नागम्मा यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीत नागम्मा यांचा मृत्यू झाला.
पोलिसांनी मात्र याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरु केला. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.
