सोलापुरात रिक्षाचालकांकडून अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

सोलापुरात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हिंगणघाट पीडितेच्या मृत्यूचं प्रकरण ताजं असून संताप व्यक्त होत असतानाच ही घटना समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. १० जणांनी मिळून मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाच जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींमधील बहुतांश जण रिक्षाचालक आहेत. इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी महाविद्यालयात शिक्षण घेते. पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मंदिराजवळ ती रडत बसली असताना एका नागरिकाने पोलिसांना यासंबंधी माहिती दिली. पोलिसांनी मुलीची चौकशी केली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. मुलीवर जबरदस्ती करत लैंगिक अत्याचार करण्यात येत होते. जुलै महिन्यापासून हा प्रकार सुरु होता. १० जणांनी आळीपाळीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले असल्याचं मुलीच्या चौकशीतून समोर आलं.

पोलिसांनी पॉस्को आणि अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा केला आहे. तसंच पाच जणांना अटक केली आहे. यामधील बहुतांश आरोपी रिक्षाचालक आहेत. इतर आरोपी सध्या फरार असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *