शाळकरी मुलीवर अॅसिड फेकण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली. प्रतीक आंग्रे (वय २५) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. पीडित मुलीच्या आईने याबाबत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पीडित मुलगी शाळेत जात असताना आंग्रे तिचा पाठलाग करून त्रास द्यायचा. त्यानंतर त्याने मुलीला धमकावण्यास सुरुवात केली. त्याने मुलीच्या चेहऱ्यावर अॅसिड टाकण्याची धमकी दिली तसेच कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने शाळकरी मुलीला भेटायला बोलावले. तिला धमकावून त्याने दुचाकीवरून नेले आणि एका घरात आंग्रेने तिच्यावर बलात्कार केला.
त्यानंतर मोबाइलवर चित्रफीत प्रसारित करीन. या प्रकाराची कोणाकडे वाच्यता करू नको, अशी धमकी त्याने दिली. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करून आंग्रेला पकडले. त्याच्या विरोधात बलात्कार तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक चित्रा चौधरी तपास करत आहेत.
