मुंबईत रेल्वे रुळावर प्रेयसीची हत्या करताना प्रियकराचा मृत्यू, काय घडलं?

प्रेयसीसोबत सुट्टया घालवण्यासाठी धुळयाहून मुंबईत आलेल्या एका ३७ वर्षीय व्यक्तीचा माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ ट्रेनच्या धडकेत मृत्यू झाला. या प्रकरणात मुंबई सेंट्रल जीआरपीमध्ये अपघाती मृत्यूची नोंद झाली असली तरी, अनेक संशयास्पद आणि चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी समोर आल्या आहेत. ज्या व्यक्तीचा रेल्वे रुळावर मृत्यू झाला, त्यावेळी प्रेयसी सुद्धा त्याच्यासोबत होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

दोघांची ओळख कशी झाली?
मृत व्यक्तीचे कुटुंब धुळयामध्ये राहते. महिला कर्जाच्या निमित्ताने सर्वप्रथम मृत व्यक्तीच्या संपर्कात आली. कर्ज मागण्यासाठी म्हणून महिला त्याच्याकडे गेली होती. त्यानिमित्ताने दोघांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर पुढे दोघांमध्ये जवळीक वाढण्यात झाले. महिलेने त्याच्याकडून घेतलेले पैसे कधीही परत केले नाहीत. १८ जानेवारीला हे जोडपे धुळयाहून बसने मुंबईत आले. त्यांनी एकत्र वेळ घालवला.

माटुंग्याहून दादरला चालत का गेले?
धुळयाला जाणाऱ्या ट्रेनमध्ये तुला बसवून देतो असे प्रियकराने त्या महिलेला सांगितले. वांद्रयाहून त्यांनी ट्रेन पकडली व माटुंगा येथे उतरले. दादर टर्मिन्सहून ट्रेन पकडण्यासाठी आपण रुळावरुन चालत जाऊ असे प्रियकराने महिलेला सांगितले. महिलेने प्रियकरावर विश्वास ठेवला. दोघेही प्लॅटफॉर्मवरुन एकत्र चालत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसते.

दादर-माटुंग्या दरम्यान रेल्वे रुळावर एका निर्जन टप्प्यात आल्यानंतर प्रियकराने महिलेला थांबायला सांगितले. लघुशंका करण्यासाठी म्हणून तो गेला. त्यानंतर मागून येऊन त्याने महिलेच्या ओढणीने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये झटापट सुरु असताना महिला तिची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करत होती.

महिलेने मृत बनण्याचे नाटक का केले?
अखेर तिची हालचाल थांबल्यानंतर ती मृत झालीय असे समजून त्याने तिचे सामान उचलले व रुळावरुन पळत सुटला. पण त्याचवेळी समोरुन ट्रेन येतेय हे त्याच्या लक्षात आले नाही व ट्रेनच्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. खरंतर महिलेने स्वत:चे प्राण वाचवण्यासाठी मृत बनण्याचे नाटक केले होते. जोडीदार तिथून निघून जाताच ती प्लॅटफॉर्मच्या दिशेने पळत सुटली.तिने आधी काही महिला प्रवाशांना नंतर पोलिसांना घडलेला सर्व प्रकार सांगितला.

रेल्वे पोलिसांनी तिची जबानी नोंदवून घेतली. मृत व्यक्तीच्या कुटुंबियांनी या प्रकरणात सखोल चौकशीची मागणी केली आहे. महिला यामध्ये सहभागी असल्याचा त्यांना संशय आहे. रेल्वे पोलिसांनी स्थानकातील वेगवेगळे कॅमेरे तपासले. महिलेच्या सहभागाचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्या व्यक्तीने महिलेची हत्या करण्याचा प्रयत्न का केला? ते स्पष्ट झालेले नाही. कर्ज न फेडल्यामुळे त्याने महिलेला मारण्याचा प्रयत्न केला असावा असा पोलिसांचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *