दृश्यम’ स्टाइलने हत्या, ५० किलो मीठ टाकून ढाब्याच्या जागेमध्ये पुरला मृतदेह, बाईक

वर्षभरापूर्वी झालेल्या हत्येप्रकरणी नागपूरमध्ये तीन जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी दृश्यम चित्रपटापासून प्रेरणा घेऊन हे कृत्य केले. आरोपींनी हत्या केल्यानंतर गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह पुरुन ठेवला होता. २०१५ साली अजय देवगणचा दृश्यम चित्रपट आला होता. त्यामध्ये अजय देवगणने पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाचा मृतदेह पोलिस स्टेशनखाली पुरल्याचे दाखवले आहे.

आरोपींनी चित्रपटात दाखवलेय त्याच पद्धतीने हा गुन्हा केला. आरोपींनी पंकज दिलीप गिरामकरची हत्या केल्यानंतर मृतदेहासह त्याची मोटारसायकल ढाब्याच्या मागच्या बाजूला असलेल्या जमिनीमध्ये पुरुन ठेवली. पंकज एका कंपनीत इलेक्ट्रीशिअन होता. प्रेम संबंधांमधून ही हत्या झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

पत्नीच्या अफेअरबद्दल समजलं?
मुख्य आरोपी अमरसिंह ऊर्फ लल्लू जोगेंद्रसिंह ठाकूर (२४) याचे गिरामकरच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. पंकजला पत्नीच्या प्रेमसंबंधांबद्दल समजले होते. पत्नीला अमरसिंहपासून दूर करण्यासाठी तो कुटुंबाला घेऊन शेजारच्या वर्धा जिल्ह्यात रहायला गेला. २८ डिसेंबरला पंकज बाईक घेऊन अमरसिंहच्या ढाब्यावर गेला व पत्नीसोबतच संबंध तोडायला सांगितले.

दोघांमध्ये तिथे हाणामारी झाल्यानंतर संतापाच्या भराने अमरसिंहने त्याच्या डोक्यात हातोडीने प्रहार केले. पंकज तिथेच कोसळला. जागीच त्याचा मृत्यू झाला असे अधिकाऱ्याने सांगितले. अमरसिंहने ढाब्यावरील आचारी आणि आणखी एका साथीदाराच्या मदतीने स्टीलच्या पिंपात मृतदेह ठेवला. साथीदारांच्या मदतीने सर्व पुरावे नष्ट करण्याचा त्याने कट रचला.

मृतदेह पुरण्याआधी ५० किलो मीठ टाकलं?
त्याने एका माणसाला बोलावले व ढाब्याच्या मागच्या बाजूला १० फूट खोल खड्डा खणून घेतला. अमरसिंहने नंतर त्या खड्डयात ५० किलो मीठ टाकले. त्यावर मृतदेह ठेवल्यानंतर मातीने खड्डा भरला. मोटारसायकल सुद्धा त्याच खड्डयामध्ये पुरली. आरोपीने मृत पंकजचा मोबाइल फोन राजस्थानला जाणाऱ्या ट्रकमध्ये फेकून दिला.

साध्या वेशात पोलीस का जायचे?
पंकज गिरमकर घरी न आल्यामुळे कुटुंबियांनी पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. गुन्हे शाखेच्या पोलिसांना बरेच प्रयत्न करुनही यश मिळत नव्हते. त्यानंतर पोलिसांना टीप मिळाली. त्या आधारावर पुरावे शोधण्यासाठी पोलीस साध्या वेशात अनेकदा ढाब्यावर गेले. पोलिसांना ठोस पुरावे मिळाल्यानंतर त्यांनी ठाकूर त्याचा कुक मनोज तिवारी (३७) आणि तुषार डोंगरे (२८) यांना शुक्रवारी रात्री ताब्यात घेतले.

पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. रविवारी पोलिसांनी ढाब्याच्या मागच्या भागात खोदकाम सुरु केल्यानंतर तिथे मृतदेहाचे अवशेष आणि मोटारसायकल सापडली. हत्येच्या कलम ३०२ अंतर्गत आरोपींना अटक करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *