आई, मुलीची आत्महत्या

वयोवृद्ध आई आणि तिच्या मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना विलेपार्ले परिसरात उघड झाली आहे. मीना परांजपे (७३) आणि मंजिरी परांजपे (५३) अशी मायलेकीची नावे असून, मुलीची मानसिक स्थिती ठीक नसल्याने तिचा भविष्यात सांभाळ कोण करणार या चिंतेने हे कृत्य करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नावाजलेले कुटुंब म्हणून विलेपार्लेत परांजपे कुटुंबाची ओळख होती.

प्रीतम हॉटेलसमोर ‘परांजपे बंगलो’मध्ये दोघी राहत होत्या. घरकाम करणारी महिला बुधवारी बंगल्याबाहेर आली, पण अनेकदा दरवाजा ठोठावूनही आतून काहीच प्रतिसाद येत असल्याने तिने परांजपेंच्या नातेवाईकांना कळविले. नातेवाईक आल्यानंतर त्यांनी विलेपार्ले पोलिसांच्या मदतीने दरवाजा तोडला असता मायलेकी बंगल्यातील बेडरूममध्ये पंख्याला गळफास लावलेल्या स्थितीत आढळल्या. पोलिसांनी दोघींना तत्काळ कूपर रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी सापडले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *