कंगनाला पद्मश्री जाहीर होताच आलियाकडून ‘खास’ शुभेच्छा

कलाविश्वात अभिनेत्री कंगना रानौत हिच्याविषयी कलाकारांमध्येही काही गट असल्याचं काही वेळेस लक्षात येतं. आपल्याला न पटणाऱ्या गोष्टींवर ठामपणे मतप्रदर्शन करणारी हीच कंगना अनेकांच्या विरोधासही सामोरी जाते. मुळात याच ठाम वक्तव्यांच्या बळावर कंगना चर्चेतही असते. सध्या बी- टाऊनची ही क्वीन लक्ष वेधतेय ते म्हणजे तिच्या वाट्याला आलेल्या एका यशामुळे.

नुकताच कंगनाच्या नावे भारत सरकारकडून देण्यात येणाऱ्या पद्मश्री या पुरसाकाराची घोषणा करण्यात आली. चित्रपट जगतात दिलेल्या योगदानासाठी कंगनाला हा पुरस्कार देण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं. ज्यानंतर तिला अनेकांनीच शुभेच्छा दिल्या. ज्यामध्ये आलिया भट्टचंही नाव होतं.

आलियासोबतचं कंगनाचं समीकरण तसं फार चांगलं नाही. मुळात आलियाला खडे बोल सुनावणारी कंगना त्यानंतर त्यावर व्यक्त होणारी आलिया ही सर्व परिस्थिती पाहता त्यांच्या नात्याचा अंदाज लावण तसं सोपं. पण, ही सारी कटुता दूर सारत एक सहकारी कलाकार यश संपादन करत असताना त्यांच्या यशाला दाद देणं आलिया विसरलेली नाही हेच तिच्या या कृतीवरुन लक्षात येत आहे.

आलियाने कंगनासाठी एका खास आणि तितकाच आकर्षक असा पुष्पगुच्छ पाठवला आहे. ज्यामध्ये पद्मश्री मिळाल्याबद्दल आलियाने तिला शुभेच्छा दिल्याचं लिहिलं होतं. कंगनाची बहीण, रंगोली चंदेल हिने या पुष्पगुच्छाचा फोटो पोस्ट केला. हे पाहा, आलियानेही कंगनाला फूलं पाठवली आहेत. कंगनाचं मला ठाऊक नाही, पण मला हे सारं अफलातून वाटतंय. कंगनाने आलियाने दिलेल्या शुभेच्छांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण, यावर तिच्या बहिणीचं ट्विट मात्र अर्थातच लक्ष वेधणारं ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *