2012 सालच्या निर्भया सामूहिक बलात्कार व खून प्रकरणात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या चौघांविरुद्ध डेथ वॉरंटफ जारी करणार्या सत्र न्यायाधीशांची बदली करण्यात आली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश सतीश कुमार अरोरा यांची सर्वोच्च न्यायालयात अतिरिक्त निबंधक म्हणून एका वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली असल्याचे दिल्ली उच्च न्यायालयाच्या महानिबंधकांनी पतियाळा हाऊस न्यायालयातील जिल्हा न्यायाधीशांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. अरोरा यांना तात्काळ मोकळे करावे, असे 20 जानेवारीच्या या पत्रात म्हटले आहे. बदली होण्यापूर्वी अरोरा हे निर्भया प्रकरणाची, तसेच दिल्ली पोलिसांच्या विशेष विभागाने दाखल केलेल्या इतर प्रकरणांची सुनावणी करत होते.
