प्रियकराच्या मदतीने महिलेकडून पतीची हत्या

प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करणाऱ्या एका महिलेला ठाणे ग्रामीण पोलिसांनी बुधवारी अटक केली. चाहत विश्वकर्मा (३५) असे या महिलेचे नाव असून पोलिसांनी तिचा प्रियकर विराज पालांडे (२५) यालाही अटक केली आहे.

कुळगाव येथे उल्हास नदीच्या पात्रात सोमवारी एक मृतदेह ठाणे ग्रामीण पोलिसांना आढळून आला होता. हा मृतदेह बिजय विश्वकर्मा याचा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बिजयची पत्नी चाहत हिला चौकशीसाठी बोलावले. तिच्या चौकशीदरम्यान ती समाधानकारक उत्तरे देत नव्हती. त्यामुळे पोलिसांना तिच्यावर संशय येत होता. तिची कसून चौकशी केल्यानंतर तिने प्रियकराच्या मदतीने बिजयच्या खुनाची कबुली दिली.

चाहत हिचे विराज पालांडे या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधात बिजय अडसर ठरत होता. त्यामुळे चाहत आणि विराजने बिजयच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार रविवारी तिने बिजयला दारू प्यायला दिली. त्यानंतर झोपेच्या गोळ्या देऊन विराजच्या मदतीने गळा आवळून तसेच चाकुहल्ला करून बिजयचा खून केला. त्यानंतर बिजयचा मृतदेह उल्हास नदीच्या पात्रात फेकून दिला.

चाहतच्या कबुलीनंतर पोलिसांनी डोणेगाव येथून विराजलाही ताब्यात घेतले. याप्रकरणी पोलिसांनी चाहत आणि विराज या दोघांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *