कौतुकास्पद! मराठमोळे हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीचे वकील

आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांची थेट ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. ब्रिटनच्या न्यायमंत्रालयाने नव्या नियुक्त्या संदर्भातील यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये मराठमोळे हरीश साळवे यांच्या नावाचा समावेश आहे. हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीसाठी कोर्ट ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठीचे ‘क्वीन काऊंसिल’ म्हणून काम पाहतील. १६ मार्च रोजी हरीश साळवे यांची अधिकृतपणे नियुक्ती होईल.

कायदा आणि वकिलीच्या क्षेत्रामध्ये महत्वाची आणि मोठी कामगिरी करणाऱ्यांना ब्रिटनच्या महाराणीचे वकील म्हणून निवडले जाते. साळवे यांचे आंतरराष्ट्रीय कायदाक्षेत्रातील मोठे योगदान असल्याने त्यांना हा बहुमान मिळाला आहे, अशी माहिती शाही घराण्याच्या सूत्रांनी दिली. हरीश साळवे यांनी फक्त एक रूपयांचं मानधन घेऊन कुलभूषण जाधवांची बाजू आंतरराष्ट्रीय न्यायालयात मांडली होती.

कोण आहेत हरीश साळवे ?
कोर्टात नुसतं एकदा हजर राहण्यासाठी हरिश साळवे चार ते पाच लाख रुपये घेतात असं बोललं जातं, तसंच एका संपूर्ण दिवसासाठी ते २५ ते ३० लाख रुपयांपर्यंत मानधन आकारतात असं म्हटलं जातं. हरीश साळवे यांना घरातूनच वकिलीचं बाळकडू मिळालं असं म्हणावं लागेल. कारण त्यांचे आजोबा पी. के. साळवे. ते प्रख्यात क्रीमिनिल लॉयर होते. याशिवाय त्यांचे पणजोबा हे न्यायाधीश होते. तर हरीश साळवेंचे वडील वडील एन. के. पी. साळवे हे काँग्रेसचे दिग्गज नेते होते. हरिश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. १९९२ मध्ये हरिश साळवे सुप्रीम कोर्टाचे वरिष्ठ वकील बनले आणि १९९९ मध्ये त्यांना सॉलिसिटर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. वकिली करण्याआधी ते सीए झाले. मात्र नंतर त्यावेळचे प्रसिद्ध वकील नानी पालखीवाला यांचा त्यांच्यावर प्रभाव पडला आणि त्यांनी सीए झाल्यानंतर वकिलीची डिग्री मिळवली. वकील झाल्यापासून साळवेंनी अनेक मोठे खटले लढले आहेत. यात कुलभूषण जाधव, सलमान खानचं हिट अँड रन प्रकरण, कृष्णा गोदावरी बेसिन गॅस वाद, बिल्किस बानो प्रकरण, व्होडाफोन आणि केंद्र सरकारव वाद अशा अनेक मोठ्या खटल्यांचा अनुभव साळवेंकडे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *