सोलापूरजवळ मोबाइलच्या कारणावरून शाळकरी मुलाचा खून

मोबाइल वापरण्याच्या कारणावरून एका चौदा वर्षांच्या शाळकरी मुलाचा खून झाल्याची खळबळजनक घटना सोलापूरजवळ नान्नज येथे उघडकीस आली. याप्रकरणी एका तरुणाचे नाव संशयित म्हणून समोर आले असून त्याच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अमीर अल्ताफ मुजावर असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. रविवारी सकाळी हा प्रकार उजेडात आला. सोलापूरपासून १४ किलोमीटर अंतरावर नान्नज (ता. उत्तर सोलापूर) येथे हा प्रकार घडला. नान्नज ते मार्डी रस्त्यावर एका शेताजवळ अमीर मुजावर हा गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला पोलिसांनी तत्काळ सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित म्हणून याच गावात राहणाऱ्या अरबाज अयुब शेख (वय २१) याचे नाव निष्पन्न झाले आहे. मृताच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार मृत अमीर व संशयित अरबाज हे एकमेकांना ओळखत होते. त्यांच्यात मैत्री होती. परंतु मोबाइलच्या कारणावरून त्यांच्यात भांडण झाले. यात अरबाज याने अमीर याचा गळा आवळून आणि तोंडावर दगडाने मारल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेनंतर अरबाज याने पलायन केले.

दरम्यान, सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात या गुन्ह्यची नोंद होऊन तपास सुरू  झाल्यानंतर संशयित म्हणून अरबाज शेख याचे नाव समोर आले. त्याला ताब्यात घेतले असता या घटनेचे कारण स्पष्ट झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *