मालेगावी नगरसेवकावर हल्ल्याचा प्रयत्न?

शहरातील नगरसेवक मोहम्मद अमीन मोहम्मद फारुख यांच्यावर शुक्रवारी दुपारी अज्ञाताने शस्त्राने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. दमदाटी किंवा धमकावण्याच्या उद्देशाने अज्ञात हल्लेखोराने हा प्रकार केला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

दुपारी दीडच्या सुमारास जाफर नगर येथे ही घटना घडली. नगरसेवक अमीन हे घराजवळून दुचाकीने जात असताना त्यांच्या पाठीमागून आलेल्या अज्ञात हाताच शस्त्र घेऊन त्यांचा पाठलाग करीत असल्याचा संशय अमीन यांना आला. त्यांनी लगेचच पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक रत्नाकर नवले, पवारवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी धाव घेतली. त्या अज्ञात इसमाचा पोलिसांनी पाठलाग करून त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. परंतु तो पळून जाण्यात यशस्वी झाला. दरम्यान सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *