ठाण्यात दृष्टिहीन मुलांसाठी पालिकेची शाळा

ठाणे महापालिकेच्या विविध प्राथमिक शाळांत शिक्षण घेत असलेल्या ३४ दृष्टिहीन विद्यार्थ्यांना एका छताखाली आणून त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण देण्यासाठी प्रशासनाने स्वतंत्र शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोपरी येथील महापालिका शाळा क्रमांक ९ मधील चार वर्गखोल्यांमध्ये ही शाळा सुरू करण्यात येणार असून याच ठिकाणी त्यांना ब्रेल ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून ही शाळा सुरू होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

ठाणे महापालिकेमार्फत शहरामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळा चालविण्यात येतात. या शाळांमध्ये इतर विद्यार्थ्यांसोबतच ३४ दृष्टिहीन विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, इतर विद्यार्थ्यांसोबतच दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच या विद्यार्थ्यांनाही शिक्षण घेताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. नेमकी ही बाब लक्षात घेऊन ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळा सुरू   करण्याचा निर्णय घेतला होता. या विद्यार्थ्यांचा अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण मिळावे आणि त्यांचा सर्वागीण विकास व्हावा या उद्देशातून त्यांनी हा निर्णय घेतला होता. यासंबंधीचा सविस्तर प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. त्यास सर्वसाधारण सभेने मान्यता दिल्यानंतर शाळा उभारणीचे काम सुरू करण्यात आले होते. या शाळेच्या कामासाठी २८ लाख ३२ हजार ३४९ रुपये इतका खर्च करण्यात येणार आहे.

शाळेची रचना अशी

– कोपरी येथील महापालिका शाळा क्रमांक ९ मधील चार वर्गखोल्यांमध्ये दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात येणार आहे. या शाळेच्या उभारणीचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे.

– या शाळेत लहान शिशूपासून ते आठवीपर्यंतच्या दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी तीन शिक्षक नेमण्यात येतील.

– शाळेत ब्रेल ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या शाळेत तीन शिक्षक नेमण्यात येणार आहेत.

– विद्यार्थ्यांना प्रवासभत्ता म्हणून तीन हजार रुपयेही देण्यात येणार आहेत.

– मुंबई आणि परिसरातील विद्यार्थ्यांच्या सोयीच्या दृष्टिकोनातून कोपरी रेल्वे स्थानकाजवळच ही शाळा उभारण्यात आली आहे, अशी माहिती महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी यांनी दिली.

सॉफ्टवेअरद्वारे शिक्षण

दृष्टिहीन विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान अवगत करण्यासाठी एक विशिष्ट सॉफ्टवेअर शाळेतील संगणकांमध्ये बसविण्यात येणार आहे. तसेच दृष्टिहीन विद्यार्थ्यांना पुस्तके वाचता यावीत यासाठी संगणकामध्ये विशिष्ट सॉफ्टवेअर बसविण्यात येणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली पुस्तके ब्रेल लिपीत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

ठाणे तसेच आसपासच्या शहरांतील दृष्टिहीन विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मुंबईला जावे लागू नये, यासाठी ठाण्यात दृष्टिहीन विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळा सुरू करण्यात येत आहे. लवकरात लवकर ही शाळा खुली करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. – अक्षता लेके, समावेशित विषयतज्ज्ञ, ठाणे महापालिका.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *