धामणगावात प्रेमप्रकरणातून तरुणीची हत्या

प्रेमप्रकरणात वितुष्ट आल्यानंतर एका माथेफिरू तरुणाने तरुणीची चाकूने हल्ला चढवून निर्घृण हत्या केली. त्यानंतर स्वत:वरही चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना सोमवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास धामणगाव शहरातील दादाराव अडसड प्रांगणावर घडली. जखमी तरुणाला यवतमाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहे.

प्रणीता दिलीप कोंबे (१७) रा. जुना धामणगाव असे मृत तरुणीचे नाव आहे. सागर विठोबा तितुरमारे (२६) रा. दत्तापूर याने प्रणीतावर चाकूने हल्ला केला आणि नंतर स्वत:वरही वार केले. प्रणीता ही इयत्ता बारावीमध्ये शिक्षण घेत होती. नेहमीप्रमाणे आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास ती महाविद्यालयात जाण्यासाठी घरून निघाली. सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास माताजी देवस्थानजवळील स्व. दादाराव अडसड प्रांगणावर सागर हा प्रणीताला भेटला. यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वादातून सागरने अचानक अत्यंत क्रूरतेने प्रणीतावर चाकूने हल्ला चढवला. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन प्रणीता रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळली. त्यात तिचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सागरने स्वत:वरही चाकूने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी जखमी सागरला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर प्रणीताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला.

सागरची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील रुग्णालयात हलवण्यात आले. शवविच्छेदनानंतर प्रणीताचा मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यानंतर जुना धामणगाव येथे प्रणीताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हत्येचे कारण काय?

सागरने प्रेमप्रकरणातून प्रणीताची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले असले, तरी हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आज सकाळी सागर व प्रणीतात नेमका कुठल्या कारणावरून वाद झाला. सागरने टोकाचा निर्णय घेत प्रणीताची हत्या करून स्वत: आत्महत्येचा प्रयत्न का केला, हे प्रश्न अद्यापही अनुत्तरित आहेत. सागरचा जबाब आणि पोलीस तपासातून अधिक माहिती समोर येऊ शकेल. सुमारे सहा महिन्यांपूर्वी सागरविरुद्ध प्रणीताचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रणीताच्या वडिलांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली होती. मात्र, दोन दिवसानंतर प्रणीता सुखरूप घरी पोहोचली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *