ग्राहकाकडून पिशवीसाठी अतिरिक्त १४ रुपये मागणाऱ्या डॉमिनोजला १० लाखांचा दंड

ग्राहक विवाद निवारण आयोगाने डॉमिनोज कंपनीला ग्राहकांकडून पिशवीसाठी अतिरिक्त पैसे आकारल्याप्रकरणी दहा लाखांचा दंड ठोठावला आहे. चंदिगडमधील ग्राहक आयोगाने हा निर्णय दिला आहे. भारतामध्ये डॉमिनोजची मालकी असणाऱ्या ज्युबिलियन्ट फूड वर्क्स लिमिटेडला हा दंड आयोगाने ठोठावला आहे.

ग्राहकाने डॉमीनोजने आपल्याकडे पिशवीसाठी १४ रुपयांचे अतिरिक्त शुल्क मागितल्याची तक्रार ग्राहक आयोगाकडे केली होती. दोन्ही प्रकरणामध्ये एकाच वेळी सुनावणी केली आहे. या प्रकरणात आयोगाने १० लाखांचा दंड ठोठावला आहे. ग्राहकांना झालेला मानसिक त्रास आणि मनस्थापासाठी कंपनीने त्यांना प्रत्येकी दीड हजार रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. तर ज्युबिलियन्ट फूड वर्क्स लिमिटेडने दंडाच्या रक्कमेतील नऊ लाख ८० हजार रुपये चंदिगडमधील गरीब रुग्णांसाठी चालवल्या जाणाऱ्या कल्याण निधीच्या खात्यावर जमा करण्यास आयोगाने सांगितलं आहे. चंदिगडमधील पोस्ट ग्रॅज्युएट इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्चमार्फत गरीब रुग्णांच्या अन्नाची व्यवस्था या कल्याण निधीच्या माध्यमातून केली जाते.

अशाप्रकारे डॉमिनोजला ग्राहक आयोगाने दणका देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी फेब्रुवारी २०१९ मध्येही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी ग्राहकाने दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत जिल्हा ग्राहक विवाद निवारण आयोगाने जुलै महिन्यामध्ये निकाल दिला होता. यावेळी जितेंद्र बन्सल या ग्राहकाकडून पिशवीसाठी १३ रुपये ३३ पैसे अतिरिक्त रक्कम मागणाऱ्या डॉमीनोजला पाच लाखांचा दंड सुनावण्यात आला होता. मात्र त्यानंतरही कंपनीने ग्राहकांकडून पिशवीसाठी पैसे घेणे सुरुच ठेवले. १३ नोव्हेंबर २०१९ रोजी पेशाने वकील असणाऱ्या पंकज चंगोठीया यांच्याकडून डॉमिनोजच्या आऊटलेटमध्ये पिशवीसाठी अतिरिक्त १४ रुपयांची मागणी करण्यात आली. या प्रकरणी त्यांनी ग्राहक आयोगाकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणात दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. कायद्यानुसार ग्राहकांकडे पिशवीसाठी अतिरिक्त शुल्क मागण्याचा हक्क कंपन्यांना नसल्याचा युक्तीवाद पंकज यांनी केला होता.

याआधीही चंदिगडमधील बिग बाझार, लाईफस्टाइल, वेस्टसाईड, बाटा सारख्या बड्या ब्रॅण्डला ग्राहकांकडून पिशवीसाठी अतिरिक्त पैसे मागितल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात आला आहे. बाटाला ११ हजार, वेस्टसाईडला १० हजार ५००, लाईफस्टाइलला १३ हजार तर बीग बाझारला ११ हजार ५१८ रुपयांचा दंड करण्यात आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *