बॉसनेच पत्नीबरोबर ठेवायला सांगितले संबंध; १९ वर्षीय कर्मचाऱ्याने केली आत्महत्या

अहमदाबादमध्ये पाच महिन्यापुर्वी एका १९ वर्षीय तरुणाने केलेल्या आत्महत्येमागे त्याचाच बॉस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या तरुणाला त्याच्याच बॉसने पत्नीबरोबर संबंध ठेवण्यास दबाव आणल्याची माहिती जुन्या मेसेजेसमधून समोर आली आहे. तरुणाच्या मोबाईलमध्ये सापडलेल्या मेसेजमधून बॉसच्या या मागणीमुळे तो तणावाखाली होता असं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणामध्ये वासना पोलिसांनी आत्महत्या केलेल्या निखिल परमार या तरुणाचा बॉस आणि त्याच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गोमतीपूर येथे राहणाऱ्या निखिलला या दोघांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा गुन्हा या दोघांवर दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार निखिल परमार याने वासना येथील लग्नासाठी सजावटीचे सामान पुरवणाऱ्या एका कंपनीमध्ये ऑक्टोबर २०१८ पासून काम करत होता. मात्र दहा महिन्यांमध्येच त्याने आपण या कंपनीत काम करणार नाही असं स्वत:च्या वडील अशोक परमार यांना सांगितलं होतं. माझा बॉस आणि त्याची पत्नी माझा मानसिक छळ करत असल्याची तक्रार त्याने वडिलांकडे केली होती.

अशोक यांनी निखिलला त्रास होत असेल तर नोकरी सोडून दे असं सांगितलं. त्यानंतर १४ जुलै २०१९ रोजी निखिलच्या बॉसने त्याला फोन करुन पगार घेऊन जा असं सांगितलं. त्यानंतर १५ जुलै रोजी निखिलने त्याच्या वडिलांना आपण बॉसबरोबर राजस्थानमध्ये एका कामासाठी जात असल्याचं सांगितलं. त्यानंतर २० जुलै रोजी निखिलच्या बॉसने अशोक यांना फोन करुन “तुमच्या मुलाने गोडाऊनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे,” अशी माहिती दिली. अशोक हे निखिलच्या बॉसने सांगितलेल्या ऑफिसच्या पत्त्यावर पोहचले तेव्हा त्यांना निखिलचा मृतदेह ऑफिसमध्ये ठेवल्याचे अढळून आले.

निखिलच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी त्याच्या भावंडांनी त्याचा फोन तपासून पाहिला तेव्हा त्यांना काही धक्कादायक मेसेजेस अढळून आले. निखिलचा बॉस आणि त्याच्यादरम्यान झालेल्या संभाषणामध्ये दोघांमध्ये वाद झाल्याचे दिसून आले. “तू माझ्या पत्नीला तुझ्या प्रेमात पाडण्यास भाग पाडलं असं तुम्ही मला सांगितलं. मी तुमच्या सांगण्याप्रमाणे वागलो आणि तुमची पत्नीही माझ्या प्रेमात पडली. तुमच्या सांगण्याप्रमाणे आम्ही काही काळ बेकायदेशीर रिलेशनशिपमध्ये होतो. अचानक तुम्ही आम्हाला हे नात संपवण्यास सांगितलं. असं केलं नाही तर तुला पगार देणार नाही अशी धमकीही तुम्ही मला दिली. कृपया मला एखाद्या गुलामासारखी वागणूक देऊ नका. माझ्यावर दया करा,” असा मेसेज निखिलने बॉसला पाठवला होता.

प्राथमिक तपासामध्ये वासना पोलिसांनी निखिलच्या ४५ वर्षीय बॉसने त्याला पत्नीबरोबर नातं निर्माण करण्यास भाग पडल्याचं स्पष्ट झालं आहे. बॉसच्या २५ वर्षीय पत्नीबरोबर निखिलने बॉसच्या सांगण्याप्रमाणे नातं निर्माण केलं. अचानक बॉसने त्या नात्यामधून बाहेर पडण्यास सांगितल्यानंतर निखिल तिच्यापासून लांब जाऊ लागला. मात्र निखिलने नातं संपवण्याबद्दल तिला सांगितलं तेव्हा ती प्रचंड संतापली आणि तिने निखिलला शिवीगाळ केला. त्यानंतरही तीने निखिलकडे आपलं नातं टिकवून ठेऊ असा तगादा लावला होता. मात्र आता निखिलच्या बॉसला हे नातं मान्य नव्हतं. त्यामुळे या दोघांच्या वेगवेगळ्या मागण्यांमुळे निखिल मानसिक तणावात गेला आणि त्यातूनच त्याने आत्महत्येचे पाऊल उचललं, अशी माहिती समोर आली आहे. पोलिस या प्रकरणामध्ये तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग होता का याचा तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *