सोलापुरात एखाद्या चित्रपट किंवा नाटकाच्या कथानकाला शोभेल असा प्रकार घडला आहे. सोलापुरातील प्रकाश जगन गवळी नावाच्या व्यक्तीने पैशासाठी तीन महिलांसोबत लग्न केले. ऐवढ्यावरच तो थांबला नाही चौथ्या लग्नाच्याही तयारीत तो होता. मात्र, तिन्ही महिलांनी एकत्रित येऊन या भामट्याचा खरा चेहरा जगासमोर आणला आहे.
प्रकाशने २००६ साली पहिले लग्न केले होते. लग्नाच्या काही दिवसांतच प्रकाशने माहेरहून पैसे आणण्यासाठी पत्नीकडे तगादा लावत मारहाणही केली. नवऱ्याच्या जाचाला कंटाळून तिने घर सोडले. पहिल्या पत्नीने घर सोडल्यानंतर प्रकाशने २०१५ मध्ये मोठा हुंडा घेऊन दुसरे लग्न केले. दुसऱ्या लग्नाच्यावेळी बीएसएनएलमध्ये क्लार्क पदावर कार्यरत असल्याचे त्याने सांगितले होते. लग्नाला काही दिवस गेल्यानंतर प्रकाशने दुसऱ्या पत्नीसही जाच द्यायला सुरूवात केली. या जाचाला कंटाळून दुसऱ्या पत्नीनेही घर सोडलं. दुसरी पत्नी सोडून गेल्यानंतर प्रकाश तिसऱ्यांदा बोहल्यावर चढला. दोन्ही पत्नीला जसा त्रास दिला तसाच त्रास प्रकाशने तिसऱ्या पत्नीलाही दिला. परिणामी तिने देखील प्रकाशपासून दूर राहणे पसंत केले.
तीन लग्न करून प्रकाश गप्प बसला नाही. त्याने चौथ्या लग्नाचा घाट घातला. मात्र ही बाब ह्या तिघींपैकी एकीला समजली. मग तिघींनी एकत्र येऊन प्रकाशाविरोधात पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकाश विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. हा सर्व प्रकार प्रकाश याच्या लक्षात आल्यानंतर तेथून पळ काढला. परंतु हा भामटा आणखी कोणासोबतही लग्न करून तिचे आयुष्य बरबाद करणार हे जाणून असल्याने त्याला ताबडतोब पकडण्याची मागणी करण्यात आली आहे.
