‘शिवनेरी’ची ८ जूलैपासून भाडेकपात

मुंबई-पुणे मार्गावरील एसटी महामंडळाचा विश्वासार्ह वातानुकूलित प्रवास आता स्वस्त होणार आहे. या मार्गावरील शिवनेरी आणि अश्वमेध या बसच्या तिकिटात ८० ते १२० रुपयांपर्यंत कपात करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. सोमवार, ८ जुलैपासून याची अंमलबजावणी होणार आहे.

गेल्या काही काळात मुंबई-पुणे महामार्गावर ओला-उबर यांसारख्या अॅपआधारित टॅक्सी कंपन्यांनी सेवा सुरू केली. विविध प्रकारे भाड्यांमध्ये सूट देऊन प्रवाशांची मने वळवण्यात या खासगी कंपन्यांना यश आले. यामुळे शिवनेरी आणि अश्वमेधचे प्रवासी पुन्हा मिळवण्यासाठी एसटीच्या वाहतूक विभागाने तिकीटदर कमी करण्याचा प्रस्ताव सादर केला होता. भाडेवाढ अथवा कपातीसंदर्भात एसटी महामंडळाला राज्य परिवहन प्राधिकरणाने दिलेल्या विशेष अधिकारानुसार ही दरकपात करण्यात आली आल्याची माहिती महामंडळाने दिली.

एसटी महामंडळाने १४ जून २०१८ रोजी सर्व प्रकारच्या तिकिटांमध्ये १८ टक्के दरवाढ केली होती. यावाढीनंतर टप्प्याटप्प्याने अश्वमेध आणि शिवनेरीचे प्रवासी खासगी वाहनांकडे वळत होते. या पार्श्वभूमीवर मुंबई-पुणे या महत्त्वाच्या मार्गासह सात मार्गांवर धावणाऱ्या या वातानुकूलित सेवांचे भाडे कमी करण्यात आल्याची माहिती एसटी अधिकाऱ्यांनी दिली. सध्या मुंबईसह राज्यातील वेगवेगळ्या सात मार्गांवर शिवनेरीच्या दिवसभरात ४३५ फेऱ्या चालवल्या जातात. तिकीटदरांच्या कपातीमुळे एसटीचा प्रवासी पुन्हा बसने प्रवास करण्यास सुरुवात करतील, असा विश्वास महामंडळाने व्यक्त केला.

…………

मुंबई-पुणे मार्गासह सात मार्गांवरील शिवनेरी आणि अश्वमेधच्या प्रवासी भारमानासह उत्पन्नात घट होत होती. यामुळे या मार्गावरील एसटीचा प्रवासी पुन्हा मिळवण्यासह प्रवाशांना सुखरूप प्रवासाचा अनुभव घेता यावा, यासाठी तिकीटदरकपातीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *