दिंडीतील पाच लाख वारकऱ्यांना रेनकोट

पंढरपूरला विठ्ठल भेटीला जाणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा पावसापासून बचाव व्हावा यासाठी काही खासगी संस्थांच्या मदतीने तब्बल पाच लाख वारकऱ्यांना रेनकोट देण्यात आले. ‘चरणावरी माथा या वारकरी संतांच्या’ असे संत वचन या रेनकोटवर लिहिलेले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून निघालेल्या वारकऱ्यांपर्यंत रेनकोट पोहोचवण्याचे आव्हान ‘निर्मलवारी’ च्या स्वयंसेवकांनी पेलले.

महाराष्ट्रासह अन्य राज्यातूनही विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांच्या दिंडय़ा पंढरपूरच्या दिशेने माउलीचा गजर करत मार्गस्थ झाल्या आहेत. पावसापासून संरक्षण करण्यासाठी वारकरी धान्याचे रिकामे पोते सोबत घेत तर काही वर्षांपासून प्लॅस्टीकच्या मोठय़ा पिशव्यांचाच वापर करत. मात्र मागच्या वर्षी सरकारने राज्यात प्लॅस्टीक बंदी केल्यानंतर वारकऱ्यांसमोर नवाच प्रश्न उभा राहिला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय यांच्याकडे वारकऱ्यांनी कैफियत मांडल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना ही बाब सांगून वारकऱ्यांसाठी प्लॅस्टीक बंदीतून सूट दिली. दिंडीतील वारकरी बहुतांशी शेतकरी, कामगार, मजूर अशा सामान्य वर्गातील असल्याने छत्री किंवा रेनकोट खरेदी करणे त्यांना परवडणारे नसते. त्यामुळे पावसापासून बचाव करण्यासाठी वारकऱ्यांना मदत केली पाहिजे या विचारातून श्रीकांत भारतीय यांनी यंदा काही खासगी संस्थांच्या मदतीतून पाच लाख रेनकोट वारकऱ्यांना देण्याचा निर्णय घेतला. अहमदाबाद, दिल्ली, कोलकाता, भिवंडी अशा अनेक शहरातून रेनकोट उपलब्ध केले. मात्र दिंडी निघण्याच्या ठिकाणीच रेनकोट पोहचवण्याचे आव्हान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सुरू असलेल्या निर्मलवारीतील तीस हजार स्वयंसेवकांनी मानाच्या सात पालख्यांसह राज्यातील पन्नास दिंडय़ातील वारकऱ्यांपर्यंत रेनकोट पोहोचवले.

वाटपामागे केवळ सेवाभाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबात वारीची परंपरा असल्याने मागील पाच वर्षांत पालखी रस्त्यांचे चौपदरीकरण करून वारकऱ्यांना  भौतिक सुविधा देण्याचा प्रयत्न केला. केवळ सेवाभावातून रेनकोट वाटप केल्याचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीकांत भारतीय यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *