वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पग्रस्त आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला असून, या प्रकल्पाच्या पुनर्वसनाबाबत योग्य निर्णय न झाल्यास प्रकल्पग्रस्त अजय नागप यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.
कोकणात सध्या पावसाला सुरुवात झाली असून, लवकरच धरणात पाणीसाठा होईल. त्यामुळे प्रशासनाकडून गावात सध्या असलेल्या कुटुंबाच्या स्थलांतरासाठी येनकेन प्रकारे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, या प्रकल्पग्रस्तांनी गावातील देवीच्या मंदिराची उभारणी करावी. प्रकल्पग्रस्तांना २०१३ च्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार मोबदला मिळावा; गावात असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या घरांचे फेरमुल्यांकन करावे; या मागण्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. प्रकल्पग्रस्तांशी उपजिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केली. परंतु, ती निष्फळ ठरली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चेचा प्रयत्न केला. मात्र, प्रकल्पग्रस्तांनी त्यांच्याशी चर्चा करण्यास नकार दिला.
