कोकणातील खरिप हंगाम दहा दिवसांनी लांबला आहे. कारण अद्यापही पावसाची सुरुवातच कोकणात झालेली नाही. २०१४ नंतर अशी परिस्थिती कोकणात उदभवली आहे. त्यामुळे इथला बळीराजाला चिंतेत सापडला आहे. वायू चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणातील मोसमी पावसाचे आगमनच लांबले. पाऊस लांबल्याने दहा दिवसांनी पेरण्या लांबल्या आहेत. पावसात सातत्य राहिले तर लावण्या वेळेत पूर्ण होतील, अन्यथा पुन्हा बळीराजाची चिंता वाढणार, हे नक्कीच आहे.
जूनच्या पहिल्या पंधरवड्यात निर्माण झालेली अशी परिस्थिती पाच वर्षांनी उद्भवली आहे. २०१४ ला पंधरवड्यात १०२ सरासरी पावसाची नोंद झाली होती. यावर्षी सरासरी पाऊस ११७ मिमी पाऊस झाला आहे. रोहीणी नक्षत्र सुरु झाल्यानंतर पूर्वमोसमी पाऊस पडतो. परंतु यावर्षी जून महिन्याचे दोन आठवडे संपलेट तरीही पावसाची लक्षणे नाहीत. त्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे.
संगमेश्वर, चिपळूणमधील काही शेतकर्यांनी धोका पत्करत धूळ पेरण्या केल्या. ८ ते १० जून च्या दरम्यान पूर्वमोसमी पाऊस झाला; परंतु त्याचा जोर नव्हता. वायू चक्रीवादळाने पावसाचे गणित बिघडवले. जिल्ह्यातील शेतीची कामे जूनच्या पहिल्या आठवड्यात सुरु होतात. नांगरणी करून पेरे होतात, बेर करुन शेतात उकळणीच्या कामांना आरंभ होतो. मोसमी पावसाची चिन्हेच नसल्यामुळे पेरणीच्या कामांना दहा दिवस उशिर झाला. त्यानंतर पुन्हा पावसाने विश्रांती घेतली. अधूनमधून कुठेतरी एखादी सर कोसळून जाते. पुन्हा कडकडीत ऊन पडते. या वातावरणाचा परिणाम कातळावरील शेतीवर होऊ शकतो.
यंदा पाऊस सुरच न झाल्याने लावण्यांची कामेही जुलैच्या दुसर्या आठवड्यापर्यंत सुरु राहतील असा अंदाज आहे. हवामान विभागाने यंदा पाऊस अनियमित राहील अशी शक्यता वर्तविली आहे. पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या भातपिकाला अनियमित पावसाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात एखाददुसरी सर पडली. लांबलेला मोसमी पाऊस आणि अनियमित स्थिती बळीराजाची चिंता वाढवणारी आहे.
