रेल्वेत मसाज भारतीय संस्कृतीच्या विरोधात: शंकर लालवानी

रेल्वेमध्ये प्रवाशांना मसाजची सुविधा पुरवण्याची योजना वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. महिलांच्या उपस्थितीत मसाजसारखी सेवा पुरवणे हे भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याची भूमिका घेत अशा दर्जाहीन सेवांपेक्षा वैद्यकीय सेवा, डॉक्टरांची सेवा पुरवण्याची गरज आहे, असे मत इंदूरचे खासदार शंकर लालवानी यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.

इंदूरहून सुटणाऱ्या ३९ रेल्वेगाड्यांमध्ये पुढील दोन आठवड्यांमध्ये प्रवाशांना मसाजची सुविधा देण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी नुकतीच दिली होती. पश्चिम रेल्वेच्या रतलाम विभागाने हा प्रस्ताव पाठवला आहे. याद्वारे २० लाख रुपये तसेच मसाज सेवा पुरवणाऱ्या व्यक्तींच्या तिकिटांद्वारे ९० लाख रुपयांचा अतिरिक्त महसूल मिळवण्याचा उद्देश आहे. प्रवासी भाड्याव्यतिरिक्त महसूल मिळवण्यासाठी सुचवण्यात आलेल्या विविध कल्पनांतून ही योजना प्रस्तावित करण्यात आली आहे.

अशा सेवा पर्यटक विशेष रेल्वेगाड्यांमध्ये वा शताब्दी, राजधानी एक्प्रेसमध्ये पुरवणे समजू शकते, मात्र सध्याच्या योजनेनुसार पॅसेंजर ट्रेनमध्ये ही योजना आहे. पॅसेंजर गाड्यांमध्ये गरीब लोक प्रवास करतात, हा प्रवास जेमतेम तीन-चार तासांचा असतो. तिथे मसाजची गरज काय, असा सवाल लालवानी यांनी १० जून रोजी रेल्वेमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. रेल्वेत मसाज सुविधा अनावश्यक असून अनेक महिला संघटनांनी याविरोधात आपल्याकडे तक्रारी केल्याचेही लालवानी यांनी सांगितले.

तीन गटांत सुविधा

रेल्वेच्या योजनेनुसार गोल्ड, डायमंड आणि प्लॅटिनम अशा तीन गटांत ही सुविधा पुरवण्यात येणार आहे. गोल्ड वर्गवारीअंतर्गत चिकट नसलेल्या तेलाने वा ऑलिव्ह तेलाने मसाज केला जाणार असून त्यासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. डायमंड वर्गवारीअंतर्गत २०० रुपयांत सुगंधी तेलाने, तर प्लॅटिनममध्ये ३०० रुपयांत मलमाने मसाज केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *