‘इन्स्टाग्राम’वरील मैत्री पडली महागात

‘इन्स्टाग्राम’वरील एका मैत्रिणीने चॅटिंग करून तरुणाला भेटायला बोलावले. तरुण मैत्रिणीला भेटायला गेला असता अकरा जणांनी मिळून त्याच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावून त्याचे अपहरण केले. पोलिसांनी तत्काळ तपास करून त्याची सुटका केली. हिंजवडी फेज तीन ते देहूरोड दरम्यान हा सर्व प्रकार घडला.

सूरज संजय कोळी (वय २२, रा. आकुर्डी, मूळ रा. पंढरपूर, जि. सोलापूर) असे अपहरण आणि सुटका झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने या प्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आदित्य कोडगी, गणेश पुरी, वैभव उपाडे, हृतिक जाधव, शुभम वाळके, बाळा लोखंडे, सुप्रिया आव्हाड आणि अन्य चार जण अशा एकूण अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ निरीक्षक यशवंत गवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज आणि गणेश पुरी यांचे पटत नव्हते. ही गोष्ट सूरजने त्याचा मित्र मोन्या कदमला सांगितली. याचा राग मनात धरून गणेश पुरी आणि त्याच्या साथीदारांनी सूरजच्या अपहरणाचा कट रचला. त्यानुसार आरोपींनी सुप्रिया आव्हाड या तरुणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून सूरजशी चॅटिंग केले. त्या वेळी सुप्रियाने सूरजला हिंजवडी फेज तीन येथे टिनेल्स टाउन सोसायटीत बुधवारी रात्री नऊ वाजता भेटण्यासाठी बोलावले. त्यानुसार सूरज टिनेल्स टाउन सोसायटीत जवळ गेला असता, आदित्य गोडगी याने त्याच्या दुचाकीला धक्का दिला. त्यामुळे सूरज खाली पडला. त्यानंतर गणेश पुरी याने त्याच्या गळ्यातील साडेतीन तोळ्यांची साखळी हिसकावून नेली; तसेच त्याच्याकडील गावठी पिस्तुलाने ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याला सर्व जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून पळवून नेले.

सूरजच्या मित्राने याबाबत पिंपरी-चिंचवड नियंत्रण कक्षाला माहिती दिली. सूरजला घेऊन जाताना आरोपींनी काळा खडक असा उल्लेख केल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली. त्यानुसार देहूरोड येथे पोलिसांनी नाकाबंदी केली. पोलिसांनी आरोपींकडून गावठी पिस्तूल जप्त केले आहे. हिंजवडी, देहूरोड व गुन्हेशाखा युनिट दोनच्या पथकाने संयुक्त कामगिरी करून आरोपींना अटक करून सूरजची सुखरूप सुटका केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *