तीव्र दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे झालेल्या २६१ आत्महत्या हे मराठवाडय़ातील आठ जिल्ह्य़ांमधील एक चित्र असले, तरी याच पाण्याने तहानग्रस्त भागात मद्यनिर्मितीला उधाण आले आहे. यंदा औरंगाबाद शहरातील विदेशी मद्य उत्पादन १२ टक्क्यांनी वधारले, तर बीअर उत्पादनात १४ टक्क्यांची वाढ झाली. ज्या भागात जल कमतरता आहे, त्याच भागात ऊस उत्पादन जसे वाढले तसेच मद्यविक्रीही तुफान झाल्याचे दिसून येत आहे.
मराठवाडय़ातल्या आठ जिल्ह्य़ांतून मिळालेला राज्य उत्पादन शुल्काचा आकडा ४ हजार ९१६ कोटी ५८ लाख ६ हजार २२ रुपये एवढा. गेल्या वर्षीच्या तुलनेत देशी-विदेशी, बीअर विक्रीतून मिळालेले उत्पन्न हे ६८७ कोटी रुपयांनी वाढल्याचे दिसत आहे.
पाण्यासमान मद्य रिचवणाऱ्या या भागात मध्यमवर्गीय तरुणाई व्यसनाधीनतेकडे झुकू लागली असून वैफल्यग्रस्ततेतून नागरिकांमध्ये दारू पिण्याचे प्रमाण वाढत चालले असल्याचे मत मानसोपचारतज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी व्यक्त केले.
औरंगाबाद शहरातील काही मोजक्याच कंपन्यांमध्ये उत्पादन घटल्याची आकडेवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे आहे. डीजीओ प्रा. लि. आणि सॅबमिलर स्कोल या दोन कंपन्या वगळता उत्पादनात फारशी घट दिसून आली नाही. औरंगाबाद शहरात पाच विदेशी मद्यनिर्मिती कंपन्या आहेत. नांदेड आणि उस्मानाबादमध्येही विदेशी मद्य बनविले जाते. त्यातील उस्मानाबादमधील कंपनीने या वर्षी उत्पादन केलेले नाही. तर नांदेडमधील पायोनियर डिस्टीलरीजमध्ये मद्य उत्पादनात चार टक्क्यांची वाढ दिसून आली.
ज्या वर्षांत मद्यविक्रीची दुकाने हमरस्त्यापासून ५०० मीटर आतमध्ये असावीत, असा निर्णय झाला, तेवढे वर्ष सोडले तर मराठवाडय़ात मद्य उत्पादन आणि विक्रीत मोठी वाढ झाली आहे. उत्पादनातील वाढ तुलनेने कमी असली तरी उत्पादन शुल्कात वाढ झाल्याने मराठवाडय़ातून मिळणाऱ्या उत्पादन शुल्कातील वाढ लक्षणीय आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळातही विक्रीतील वाढ साहजिक मानली जात होती. मात्र, निवडणूक आयोगाचेही विक्रीवर बारकाईने लक्ष होते. त्यामुळे या काळात फार मोठा बदल दिसून आला नाही, असे निवडणूक विभागातील अधिकारी सांगतात.
गेल्या दोन वर्षांत केवळ जानेवारीत महसुली तूट होती. अन्य ११ महिने उत्पादन शुल्कातून मिळणारा महसूल सरकारी तिजोरीत भर टाकणारा होता. जानेवारी २०१८ व जानेवारी २०१९ या महिन्यातील उत्पादन शुल्कातील तूट एक कोटी ४५ लाख १६ हजार ५३ रुपये एवढी उणे होती.
समाजजीवनातील विरोधाभास..
गेल्या वर्षी म्हणजेच २०१७-१८ मध्ये आठ कोटी १५ लाख ६८ हजार ७२६ लिटर विदेशी मद्याचे उत्पादन झाले होते. यंदा ९ कोटी १४ लाख ७७ हजार ९०९ लिटर विदेशी मद्य उत्पादित झाले. बीअर उत्पादनातही मोठी वाढ झाली. २८ कोटी ८२ लाख १३ हजार १४४ लिटर बीअर उत्पादित झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ १४ टक्क्यांची आहे. जेथे पाण्यासाठी जनतेला वणवण करावी लागत आहे, त्याच भागातील मद्य उत्पादनाची आणि विक्रीची आकडेवारी समाजजीवनातील विरोधाभास सांगणारी आहे.
