अहमदनगरमध्ये प्रेमी युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, तरुणीचा मृत्यू

अहमदनगर- जामखेड रस्त्यावरील चिचोंडी पाटील येथे बंद पडलेल्या हॉटेलमध्ये प्रेमी युगुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला असून तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तरुणीच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे तरुणाविरोधात तक्रार दाखल केली आहे. मुकुंद भोजने (वय २३) असे या तरुणाचे नाव असून त्याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बीडमधील कडा गावात अवंतिका दळवी (वय २१) आणि मुकुंद भोजने हे दोघे राहत होते. काही  महिन्यांपूर्वी अवंतिका तिच्या कुटुंबीयांसह पुढील शिक्षणासाठी पुण्यातील वारजे येथे रहायला गेली. दोन दिवसांपूर्वी मुकुंदने तिला पुण्यातून नगर येथे भेटायला बोलावले. यानंतर दोघेही चिचोंडी पाटील येथे  एका बंद हॉटेलमध्ये गेले. दोघांनी सोबत आणलेल्या डब्यातून जेवण केले. यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.

दुसरीकडे मुकुंदने आत्महत्या करत असल्याचे कुटुंबीयांना सांगितले होते. त्यामुळे मुकुंदचे नातेवाईक त्याचा शोध घेत होते. अखेर नातेवाईकांना मुकुंद आणि अवंतिका गळफास घेतलेल्या स्थितीत सापडले. त्यांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केले. अवंतिकाचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर मुकुंदवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबीयांचा त्या दोघांच्या प्रेमसंबंधांना विरोध होता आणि यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा पोलिसांचा संशय आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *