हत्येनंतर नवऱ्याचं धडावेगळं मुंडकं घेऊन पत्नी पोहोचली पोलीस स्थानकात

नवऱ्याच्या अनेक वर्षांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळलेल्या महिलेने नवऱ्याची हत्या केली. त्यानंतर त्याचं कापलेलं मुंडकं घेऊन पोलीस स्टेशन पोहोचली. आसामच्या लखीमपूर जिल्ह्यात मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. माझगावमध्ये रहाणारी महिला प्लास्टिक बॅगमधून नवऱ्याचं कापलेल मुंडक घेऊन धालपूर पोलीस चौकीमध्ये आली होती.

आरोपी गुणेश्वरी बार्काटाकीने (४८) पती मुधीरामची (५५) हत्या केल्याची कबुली दिली. गेली अनेकवर्ष मुधीराम मला मारहाण करत होता. अनेकदा त्याने मला जखमीही केले होते. मी त्याला सोडण्याचा फार आधीच विचार केला होता पण मुलांमुळे मी विभक्त होऊ शकले नाही. शेवटी मला हा त्रास असह्य झाला होता. मी त्याला मारले नसते तर त्याने माझी हत्या केली असती असे गुणेश्वरीने स्थानिक वाहिनीशी बोलताना सांगितले.

गुणेश्वरीने धारदार शस्त्राने हल्ला करुन मुधीरामची हत्या केली. त्यानंतर त्याचे शीर धडावेगळे केले. प्लास्टिक बॅगमध्ये तिने नवऱ्याचं कापलेलं मुंडकं ठेवलं व पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीस स्टेशनमध्ये गेली. गुणेश्वरीला पाच मुले आहेत. दोन मुलगे आणि तीन मुली आहेत. स्थानिक न्यायालयाने बुधवारी गुणेश्वरीला न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *