बिग बॉसचा पहिला सीझन गाजल्यानंतर दुसऱ्या सीझनमध्ये कोण कोण कलाकार असणार याची उत्कंठा सर्वांनाच लागून राहिली होती. कलर्सवाहिनीवर आज पार पडलेल्या ग्रँड प्रीमिअरमधून सर्व कलाकारांनी जोरदार एन्ट्री घेत अनेक चर्चांना पूर्ण विराम दिला आहे.
बिग बॉसचे प्रोमोज सुरू झाल्यापासून कोणते स्पर्धक या सीझनमध्ये सहभागी होणार आहेत, यावर अनेक तर्क-वितर्क लावण्यात आले. अनेक चर्चा पाहायला मिळाल्या. आज झालेल्या ग्रँड प्रीमिअर शोनंतर या सर्व चर्चा थांबल्या. मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे यांनी दमदार परफॉर्मन्स करत बिग बॉसच्या घरात पहिलं पाऊल टाकलं. त्यांना त्यांचा ७ हा लकी नंबर मिळाला. त्यानंतर दिगंबर नाईक आणि नेहा शितोळे यांनी घरात एन्ट्री केली. बिग बॉसच्या ग्रँड स्टेजवर दिगंबर नाईक यांनी गाऱ्हाणंही घातलं. यानंतर नेता अभिजित बिचुकले यांनी प्रवेश केला. अभिनेता होण्याचे स्वप्न उराशी बाळगले, होते. मात्र समाजासाठी नेता बनलो, अशा शब्दांत त्यांनी आठवणी जागवल्या. यंदा सांगली आणि सातारा मतदारसंघातून लोकसभेसाठी उभे होते. राष्ट्रपतीपदासाठीही फॉर्म भरला होता. महेश मांजरेकर यांनी माझ्या पक्षात यावे आणि मुख्यमंत्री व्हावे, अशी थेट ऑफर अभिजीत बिचुकले यांनी मांजरेकरांना दिली.
कलर्स वाहिनीवरील राधा प्रेम रंगी रंगली या मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या वीणा जगतापने बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. महाराष्ट्राची महागायिका वैशाली माडेने पिंगा ग पोरी पिंगा हे गाणे सादर करत बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. वैशाली माडेने ६ व्या क्रमांकावर तिच्या नावाची पाटी लावली. हा क्रमांक लकी आहे, हे तिने सांगितले. सारेगमप मराठी आणि हिंदीमध्ये तिचा स्पर्धक क्रमांक ६ होता आणि ती दोन्ही स्पर्धा जिंकल्या. यानंतर देवयानी फेम शिवानी सुर्वेन घरात एन्ट्री घेतली. शिव ठाकरे, लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, ज्येष्ठ अभिनेते विद्याधर उर्फ बाप्पा जोशी, शेफ पराग कान्हेरे, मैथिली जावकर, माधव देवचक्के, रुपाली भोसले आणि अभिनेता अभिजित केळकर यांनी आपले जबरदस्त परफॉर्मन्स देत बिग बॉसच्या घरात प्रवेश मिळवला.
मला कुणी नडला तर मी त्याला नडते. त्यामुळे घरात मी तशीच असणार, असे विधान करत बिग बॉसमधील पहिल्या लोककलावंत सुरेखा पुणेकर यांनी आपले मनसुबे उघड केले. यानंतर शिवानी आणि शिवमध्ये शाब्दिक चकमकही रंगली. पहिल्याच दिवशी काही खटके उडाल्यामुळे आगामी १०० दिवस बिग बॉसच्या घरात काय काय पहावं लागणार, हे औत्सुक्याचे ठरणार आहे.