सरकारने शेतकऱ्याला दिले ४ रुपयांचे अनुदान

सरकार शेतकऱ्यांचेच असून शेतकऱ्यांवर कधीही अन्याय होऊ देणार नाही, असे सतत सांगणाऱ्या राज्य सरकारने माढ्यातील एका शेतकऱ्याला फक्त ४ रुपयांचे अनुदान दिल्याने सरकारच्या शेतकऱ्यांविषयीच्या कळवळ्यावर माढ्यातील शेतकऱ्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. दुष्काळात खरिपाच्या पिकांची हानी लागल्याने शेतकरी उध्वस्त झाले आहेत. अशात सरकारकडून मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारने चार रुपयाचे अनुदान दिल्याने आता आमचा वाली कोण असा प्रश्न शेतकऱ्यांन पडला आहे. मदत द्यायची नव्हती तर दिली नसती तरी चालले असते, मात्र चार रुपये अनुदान देऊन थट्टा का करताय, असा प्रश्न आता शेतकरी विचारु लागला आहे.

ढवळस गावातील शेतकरी पंडीत इंगळे यांना राज्य सरकारने दुष्काळ निधीपोटी ४ रु देऊ केले आहेत. असे करून सरकारने आगीत तेल ओतण्याचे काम केले असल्याचे शेतकरी म्हणत आहेत. पंडीत इंगळे यांची एक एकर जमीन असून सुरुवातीला त्यांनी आपल्या जमिनीत उस लावला. मात्र तो जळून गेल्याने इंगळे यांनी त्यात तूर लावली होती. तूरही जळून गेल्यानंतर पंचनामा करायला आलेल्या तलाठ्याला ही वस्तुस्थिती त्यानी दाखवली होती. मात्र सरकारकडून खरिपाला केवळ चार रुपयाचे अनुदान त्यांच्या बॅंक खात्यात जमा झाले. ही कृर चेष्टा असल्याचे इंगळे यांचे म्हणणे आहे. बॅंकेतून कमीतकमी ५०० रुपये काढता येतात. असे असताना सरकारने दिलेले चार रूपये कसे काढायचे, हा प्रश्न पंडीत इंगळे यांना पडला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *