सावत्र पित्याने अडीच वर्षांच्या मुलीला घेण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिने नकार देत रडण्यास सुरुवात केली. हे पाहून काही नागरिक त्याच्याकडे पाहून हसले. त्यामुळे चिडलेल्या सावत्र पित्याने अडीच वर्षांच्या चिमुकलीला घरी गेल्यानंतर जबर मारहाण करून पायाखाली रगडून पाण्यात बुडविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारात ही चिमुकली बेशुद्ध पडल्यानंतर तिच्यावर योग्य उपचार न करता तो निघून गेला. येरवड्यातील पोते वस्ती येथे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे.
याबाबत मुलीच्या आईने येरवडा पोलिसांकडे तक्रार दिली आहे. त्यानुसार येरवडा पोलिसांनी त्या मुलीच्या पित्यास अटक करून कोर्टात हजर केले. कोर्टाने त्याला २५ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व आरोपी यांनी दुसरे लग्न केले आहे. पीडित मुलगी ही आरोपीची सावत्र मुलगी आहे. शनिवारी आरोपी व तक्रारदार हे मुलीला घेऊन खरेदीसाठी गेले होते. खरेदी झाल्यानंतर तक्रारदार यांच्या हातात बाजाराच्या पिशव्या होत्या. त्यामुळे आरोपीने मुलीला उचलून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलीने वडिलांकडे जाण्यास नकार देत ती रडू लागली. हा सर्व प्रकार पाहून रस्त्यावरील लोक त्याच्याकडे पाहून हसले. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने घरी आल्यानंतर चिमुकलीला किचनमध्ये घेऊन जात हाताने जबर मारहाण केली.
आरोपीचे क्रूर वर्तन
तक्रारदार या मुलीला मारहाण करू नका, अशी विनंती करत होत्या. तरीही आरोपी हा मुलीला मारहाण करत होता. तसेच, त्याने कपडे धुण्याच्या खडबडीत जागेवर मुलीला आपटले. तिच्या अंगावर पाय ठेवून जमिनीवर रडगले. त्यानंतर तिला पाण्यात बुडविले. मुलगी बेशुद्ध पडल्याचे पाहून तिला तक्रारदार यांच्या ताब्यात दिले. त्या वेळी मुलीच्या कपाळ, गाल, ओठ आणि पाठीतून रक्त येत होते. तक्रारदार महिलेने मुलीला रुग्णालयात घेऊन जाण्याची विनंती केल्यानंतर आरोपी तिला जवळच्या खासगी रुग्णालयात घेऊन गेला. त्या ठिकाणी मुलीवर प्रथमोपचार करण्यात आले. मात्र, पुढील उपचार न करता आरोपीने तिला पुन्हा घरी आणून सोडले. सध्या या चिमुकलीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
