अश्लील चाळे करणाऱ्या वृद्धाला अटक

ऐरोली सेक्टर ९ मधील दिवा गावात रहाणाऱ्या एका ७६ वर्षीय वृद्धाने नऊ वर्षीय मुलीसोबत अश्लील व लैंगिक चाळे करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तुलसीदास वक्कर (७६) असे या वृद्धाचे नाव असून रबाळे पोलिसांनी त्याच्यावर विनयभंगासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

या प्रकरणातील आरोपी तुलसीदास याने गेल्या मंगळवारी इमारतीखाली खेळत असलेल्या नऊ वर्षीय मुलीला परीक्षेत मिळालेल्या गुणांबाबत विचारणा केली. तसेच, तिला पेढे देण्यास सांगतानाच त्याने तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पीडित मुलीने त्याला विरोध करून ती इमारतीच्या पाठीमागे गेली असताना आरोपी तुलसीदास हा तिच्या पाठीमागे इमारतीबाहेर गेला आणि तिच्याशी पुन्हा अश्लील व लैंगिक चाळे करू लागला. अखेर पीडित मुलीने घडल्या प्रकाराची माहिती आई-वडिलांना दिली. पीडित मुलीच्या आई-वडिलांनी आरोपी तुलसीदासकडे जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, त्याने असे काही केले नसल्याचा आव आणला. त्यामुळे पीडित मुलीच्या आई-वडिलांनी इमारतीच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर त्याने मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचे आढळून आले. त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी शनिवारी रबाळे पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. त्यानुसार त्याला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *