रुग्णांनी सदैव गजबजलेल्या मुंबईतील सायन रुग्णालयात एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही महिला एका रुग्णाची नातेवाईक असल्याचे समजते. या महिलेवर बलात्कार करणाऱ्या नराधमाचे नाव दीपक अन्नाप्पा कुंचीकुर्वे (३१) असून तो सायन रुग्णालयात सफाई कर्मचारी म्हणून काम करतो. आपण रुग्णालयाचे बिल कमी करून देऊ, असे आमिष दाखवून दीपकने या महिलेला रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरील निर्जन भागात नेले. याठिकाणी दिपकने महिलेवर अत्याचार केले. ही घटना उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. सायन रुग्णालयात राज्य सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक २४ तास तैनात असूनही हा प्रकार कसा घडला, अशी शंकाही उपस्थित झाली आहे.
पीडित महिलेची बहीण रुग्णालयात दाखल आहे. बहिणीची देखभाल करण्यासाठी पीडित महिला रुग्णालयात येत असे. दीपक कुंचीकुर्वे याठिकाणी सफाई कामगार असल्याने त्याचे पीडित महिलेशी अनेकदा बोलणे होत असे. महिलेशी ओळख वाढल्यानंतर दीपकने आपण रुग्णालयाचे बिल कमी करून देऊ, असे आश्वासन महिलेला दिले. त्यासाठीचा फॉर्म भरण्यासाठी दीपक पीडित महिलेला रुग्णालयाच्या पाचव्या मजल्यावरील निर्जन भागात घेऊन गेला. यानंतर दीपकने तिच्यावर बलात्कार केला.
