भिवंडीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात शुक्रवारी पहाटे चार ते पाच दरोडेखोरांनी चोरी केल्याची घटना समोर आली आहे. दरोडेखोरांनी मंदिरातील दानपेटीतील १० ते १२ लाख रुपयांची रोकड चोरली असून मंदिरातील सुरक्षा रक्षकाला खांबाला बांधून दरोडेखोरांनी पळ काढला. या घटनेच्या निषेधार्थ वज्रेश्वरीत शुक्रवारी बंदची हाक देण्यात आली आहे.
शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास चार ते पाच दरोडेखोर वज्रेश्वरी देवीच्या मंदिरात गेले. त्यांनी मंदिरातील सुरक्षा रक्षकाला चाकूचा धाक दाखवत त्याला खांबाला बांधले. यानंतर त्यांनी मंदिरातील पाच दानपेट्या तोडल्या आणि त्यामधील १० ते १२ लाख रुपयांची रोकड घेऊन पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ग्रामस्थांनी शुक्रवारी गावात बंदची हाक दिली आहे. तर दुसरीकडे मंदिराच्या विश्वस्त मंडळाने शुक्रवारी मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात येईल, असे म्हटले आहे.
