नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी, तरुणाची आत्महत्या

डहाणू तालुक्यातील वाणगाव येथील एका तरुणाने सहकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राहुल मिश्रा (२४) असे या तरुणाचे नाव असून काही दिवसांपूर्वी त्याच्या सहकाऱ्यांनी त्याची नग्न छायाचित्रे काढली होती. त्या छायाचित्रांवरून ते त्याला ब्लॅकमेल करत होते.

बोईसरमधील आरती ड्रग्स या कंपनीमध्ये मशिन ऑपरेटर म्हणून काम करणारा राहुल शिवाजीनगरमधील इमारतीत आपल्या दोन मित्रांसह भाड्याने राहात होता. एक दिवस कामावरून नेहमीप्रमाणे रात्री ८ वाजता घरी येऊन तो झोपला होता. त्यानंतर त्याच्या दोन्ही सहकाऱ्यांनी त्याला नग्न करून त्याची छायाचित्रे काढली. याबाबत माहिती मिळाल्यानंतर राहुलने ती छायाचित्रे डिलीट करण्याची विनंती केली. मात्र त्याच्या सहकाऱ्यांनी नकार देत चार हजार रुपयांची मागणी केली. तसेच पैसे न दिल्यास हे फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकीही दिली. राहुलची आर्थिक परिस्थिती हालाखिची असल्याने चार हजार रुपये देणे शक्य नसल्याने त्याने वाणगाव येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. राहुलच्या फोनमध्ये सहकाऱ्यांनी धमकावल्याचे मेसेज मिळाले असून त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे. याबाबत गुन्हा नोंदवण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक सुरेंद्र गरड अधिक तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *