1 मे पासून ‘या’ आर्थिक गोष्टींत होणार बदल

येत्या 1 मे 2019 पासून काही आर्थिक नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. त्याचा प्रभाव थेट आपल्या जीवनावर पडणार आहे. बदलण्यात येणाऱ्या नियमांमध्ये बँक, रेल्वे, विमानसेवा यांच्या संबंधित आर्थिक गोष्टींमध्ये बदल होणार आहेत. सरकारी आणि बिगर सरकारी संस्थांच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा व्हावी, यासाठी सातत्याने अशाप्रकारे नियमांमध्ये बदल करण्यात येतात. त्यामुळे पाहूयात कोणत्या आर्थिक गोष्टीत बदल होणार आहे.

1) SBI : 1 मेपासून बँकेचे डिपॉझिट आणि कर्जाचे व्याजदर RBIच्या बेंचमार्क दराशी जोडले जाणार आहे. यामुळे ग्राहकांना आधीच्या व्याजाच्या तुलनेत बचत खात्यावर कमी व्याज मिळणार आहे. हा नियम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त जमा रक्कम आणि कर्जदरावर लागू आहे.

2) PNB : पंजाब नॅशनल बँक स्वतःचा डिजिटल वॉलेट PNB Kitty (पीएनबी किटी )ला 1 मेपासून बंद करणार आहे. त्यामुळे 1 मेपासून आपल्याला पीएनबी किटीऐवजी दुसऱ्या पर्यायी वॉलेटचा वापर करावा लागणार आहे. बँकेने ग्राहकांना 30 एप्रिलपूर्वी वॉलेटमधील रक्कम खर्च करण्याविषयी सूचित केले होते. ही रक्कम खर्च न झाल्यास ‘आयएमपीएस’द्वारे बँकेच्या खात्यात वळते करून घेण्यासही सांगितले होते. त्यामुळे ज्या ग्राहकांनी अद्याप ‘पीएनबी किट्टी’मधील रक्कम खर्च अथवा वळती केलेली नाही, त्यांना एक दिवसाचा अवधी आहे.

3) रेल्वे आरक्षण : 1 मेपासून ट्रेन प्रवासाचे आरक्षण (रिझर्व्हेशन) करताना आपण जे बोर्डिंग स्टेशन निवडले आहे, ते तिकीट आरक्षित झाल्यानंतरही बदलता येणार आहे. एक मेपासून चार्ट तयार होण्याच्या चार तास आधी प्रवाशांना बोर्डिंग स्टेशन बदलण्याची संधी उपलब्ध होणार आहे. मात्र, बोर्डिंग स्टेशन बदलल्यानंतर तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना त्यावरचा रिफंड मिळणार नाही.

4) तिकीट रद्द केल्यास शुल्क नाही : 1 मेपासून एअर इंडियाच्या विमानाचे तिकीट 24 तासांचा आत रद्द केल्यास आपल्याला कोणतंही शुल्क द्यावं लागणार नाही.

5) गॅस दर : 1 मेपासून घरगुती गॅस सिलिंडरच्या नव्या किमती जारी होणार आहे. यावेळी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ होण्याची दाट शक्यता आहे. यापूर्वी 1 एप्रिलला घरगुती गॅसच्या किमतीमध्ये वाढ झाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *