इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील घराच्या खिडकीतून पडून एका पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना नालासोपारा येथे गुरुवारी घडली. रेहान खान असं या मुलाचं नाव आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जखमी रेहानला इमारतीतील इतर रहिवाशांनी रुग्णालयात नेलं. तेथे त्याचा मृत्यू झाला. रेहानच्या अपघाती मृत्यूनं त्याच्या पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील कमरुद्दीन हे एका खासगी कंपनीत नोकरी करतात. खिडकीला ग्रील बसवायचे होते, पण आर्थिक चणचणीमुळं ते काम करता आलं नाही, असं कमरुद्दीन यांनी सांगितलं. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पालकांनी लहान मुलांची काळजी घ्यायला हवी. ते काय करतात, कुठे आहेत, याकडे लक्ष ठेवायला हवं. खिडकीला ग्रील नसतील तर पालकांनी विशेष खबरदारी घ्यायला हवी, असं आवाहन पोलिसांनी केलं. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही अशीच दुर्दैवी घटना नालासोपाऱ्यात घडली होती. एका दीड वर्षाच्या मुलाचा इमारतीच्या सातव्या मजल्यावरील बाल्कनीतून पडून मृत्यू झाला होता.