ठाण्यातील कोरम मॉलमध्ये बुधवारी पहाटे बिबट्या आढळल्याने खळबळ उडाली. नंतर तो तेथे जवळच असलेल्या हॉटेल सत्कारच्या वाहनतळामध्ये गेल्याचे दिसले. मॉलमधील पार्किंगमधून बाहेर पडताना तिथे लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यांच्या साह्याने त्याची हालचाल टिपण्यात आली. मॉलमधून बाहेर पडल्यावर तो हॉटेल सत्कारच्या वाहनतळामध्ये शिरला. कोरम मॉलमधून बाहेर पडल्यावर बिबट्या कुठे गेला, याची माहिती मिळत नव्हती. पण नंतर तो हॉटेल सत्कारमध्ये शिरल्याची माहिती पुढे आली. बिबट्या अजून याच परिसरात असल्यामुळे येथे वन विभाग आणि पोलिसांनी वेढा दिला आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी राजीव गांधी नॅशनल पार्कचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत.
ठाण्यातील कोरम मॉलचा परिसर अत्यंत गजबजलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी बिबट्या फार काळ थांबू शकणार नाही, असा वन विभागाचा अंदाज होता. पण तो हॉटेल सत्कारमध्ये असल्याचे समजल्यावर या परिसरात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली. वन विभाग, पोलीस आणि अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये बिबट्या दिसल्यानंतर लगेचच वन विभाग आणि पोलीसांना याची माहिती देण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून शहरांमध्ये बिबट्या आल्याच्या घटना वाढत आहेत. नाशिकमध्ये अवघ्या काही दिवसांपूर्वी सावरकरनगर भागात दोन वेळा बिबट्या आला होता. त्याला वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले होते. पुण्यातही मुढव्यामध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीमध्ये बिबट्या शिरला होता. त्यालाही जेरबंद करण्यात आले होते.