बॉलिवूडमध्ये पप्पू पॉलिस्टर च्या नावाने ओळखले जाणारे विनोदवीर अभिनेते सैयद बद्र उल हसन यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. गेल्या पाच दिवसांपासून ते अंधेरीतील रुग्णालयात उपचार घेत होते.
आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘ओम नम: शिवाय’मालिकेतील त्यांचा नंदी असो किंवा ‘द स्वॉर्ड ऑफ टीपू सुल्तान’ मालिकेतील मैसूरच्या महाराजांची भूमिका; प्रेक्षकांच्या ते कायम लक्षात राहिले. ‘जोधा-अकबर’, ‘फिर भी दिल है हिन्दुस्तानी’ चित्रपटांतील त्यांच्या भूमिकाही गाजल्या.
सैयद बद्र उल हसन हे गेली २५ वर्ष या क्षेत्रात कार्यरत होते. अनेक मालिका, चित्रपट, जाहिरांतीमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचे कसब दाखवले आहे. अभिनयाव्यतिरिक्त ते शास्त्रीय नर्तकही होते.