दहावीचे हॉलतिकिट आजपासून ऑनलाइन

यंदा म्हणजेच मार्च २०१९ मध्ये दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना आजपासून (बुधवार) त्यांचे हॉलतिकीट ऑनलाइन  उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाशी संलग्न असलेल्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये आजपासून ऑनलाइन हॉलतिकिट उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

इयत्ता दहावी परीक्षेची  हॉलतिकीट ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या वेबसाइटवर उपलब्ध असतील. शाळांना देण्यात आलेल्या लॉग-इन आयडी व पासवर्डच्या आधारे शाळा ही हॉलतिकीट डाउनलोड करू शकतील. यात काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

मंडळातर्फे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार शाळांनी इयत्ता दहावी परीक्षेची ऑनलाइन हॉलतिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावी. प्रिंटिंगसाठी विद्यार्थ्यांकडून कोणतेही शुल्क घेता येणार नाही. हॉलतिकिटाची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी घ्यावी. हॉलतिकिटामध्ये विषय व माध्यमात बदल असतील तर त्याची दुरुस्ती विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावी लागणार आहे. फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांना त्यांच्या स्तरावर करता येईल. मात्र, त्याची एक प्रत तातडीने विभागीय मंडळाला पाठवावी लागेल. विद्यार्थ्यांकडून हॉलतिकीट गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांना द्यायचे आहे. फोटो चुकीचा असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी. कोणताही विद्यार्थी हॉलतिकीटापासून वंचित राहणार नाही याची दक्षता शिक्षक, मुख्याध्यापक, सर्व माध्यमिक शाळांनीच घ्यावी, असेही मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *