‘तो’ शाळेच्या वेळेतच करायचा चोरी

मुलांना शाळेत आणण्यासाठी किंवा शाळेत सोडण्यासाठी एखादी महिला घराबाहेर पडली, की ‘तो’ त्या घरात ‘हातसफाई‘ करायचा. ठराविक वेळेतच घरफोड्या करणाऱ्या या चोराला समतानगर पोलिसांनी नुकतीच अटक केली. इब्राहिम बहरुद्दीन शेख असे या चोराचे नाव असून चौकशीमध्ये त्याचा मुंबईतील सुमारे १७ चोऱ्यांमध्ये सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

कांदिवली पूर्वेकडील समतानगर परिसरात राहणारी एक महिला मुलाला आणण्याकरता शाळेत गेली. शाळेतून परतल्यावर घरातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे तिने पाहिले. घरातील दागिने आणि रोकड असा सुमारे अडीच लाखांचा मुद्देमाल गायब होता. त्यांनी याबाबत समतानगर पोलिस ठाण्यात तक्रार केली. वरिष्ठ निरीक्षक राजू कसबे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक नितीन आंधळे यांच्या पथकाने परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासले. एकामागून एक सीसीटीव्हीचा माग काढत पोलिस नालासोपारा येथे पोहोचले. नालासोपारा येथून फुटेजमधील चोराप्रमाणे दिसणाऱ्या इब्राहिमला त्यांनी ताब्यात घेतले. चौकशीमध्ये इब्राहिम याने चोरी केल्याची कबुली दिली. सखोल तपास केला त्यावेळी माटुंगा, ताडदेव, शिवाजी पार्क, डी.बी. मार्ग, व्ही.पी. रोड, दादर, भायखळा, बोरिवली, कस्तुरबा मार्ग पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या १७ गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग असल्याचे आढळले.

इब्राहिम हा डोंगरी परिसरात राहत होता. एका चोराच्या टोळीत तो काम करत होता. मात्र या टोळीच्या म्होरक्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याने स्वतःच चोरी करणे सुरू केले. मुलांना शाळेत सोडण्यासाठी अगर शाळेतून आणण्यासाठी जात असताना महिला घरात फारशी आवराआवर करत नाहीत, हे इब्राहिमला चांगले ठाऊक होते. तो एखाद्या इमारतीखाली उभा राहायचा आणि एक दिवस पाहणी करायचा. महिला तिच्या पाल्याला घेऊन बाहेर पडली की इब्राहिम अवघ्या तासाभरात चोरी करून पसार व्हायचा, अशी माहिती चौकशीतून पुढे आल्याचे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *