लॉलीपॉपची स्टीक (प्लास्टीक नळी) गिळलेल्या सव्वा वर्षाच्या आरोही कोहिनकर या चिमुरडीवर पिंपळे सौदागर येथील एका खासगी हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. नुकताच हा प्रकार समोर आला आहे.
चाकण येथील आरोही या चिमुरडीने लॉलीपॉपची स्टीक गिळल्याचे तिची आई जयश्री यांना वेळीच लक्षात आले. त्यामुळे त्यांनी तिला पिंपळेसौदागर येथील हॉस्पिटलमध्ये आणले. तेथे एक्सरेमध्ये ही नळी दिसली नाही. परंतु, जयश्री यांनी डॉक्टरांना ठामपणे सांगितले, की तिने लॉलीपॉप ची नळी गिळली आहे. त्यामुळे पुन्हा एक्सरे आणि सोनोग्राफी करण्यात आली. तेव्हा छाती आणि यकृताजवळ ही नळी असल्याचे दिसले. त्यामुळे दुर्बिणीच्या साह्याने ऑपरेशन करून ही नळी काढण्यात आली. लहान मुलांनी रिमोटचे सेल गिळल्याचे आणि ते पोटात फुटल्याचे किमान ५ प्रकार पिंपरी-चिंचवडमध्ये यापूर्वी घडले आहेत. त्यानंतर आता हा प्रकार समोर आला असून, वेळीच ही घटना लक्षात आली नसती तर आरोहीच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकला असता, असे डॉक्टरांनी सांगितले.