अनैतिक संबंधातून पतीची हत्या;पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक

पतीची हत्या करुन फरारी झालेल्या महिलेला आणि तिच्या प्रियकराला ठाणे पोलिसांनी अटक केली. या दोघांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. प्रिया नाईक आणि महेश कराळे यांची फेसबुकवर मैत्री झाली, त्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. गोपी नाईक (३०) हे ठाण्याच्या गायमुख भागात राहायचे. गोपी महापालिकेत सफाई कामगार होते. प्रियाचे महेश कराळेसोबत विवाहबाह्य संबंध होते. यातूनच या दोघांनी गोपी यांना ठार मारण्याचे डाव रचला. सायंकाळी गोपी घरी परतल्यावर या दोघांनी त्यांच्या डोक्यावर लोखंडी दांड्याने प्रहार करुन आणि त्यांचा गळा आवळून खून केला.

या दोघांनी नंतर गोपी यांना ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करुन त्यांचा वाघबीळ बोगद्यात अपघात झाल्याचे भासविले. त्यानंतर ते दोघे माथेरानला पळून गेले. शवविच्छेदन अहवालानुसार त्यांचा अपघात झाला नसुन, त्यांची हत्या करण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांना हत्या झाल्याचं कारण कळताच त्यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क साधला. मृत्यूची खरी माहिती कळल्यानंतर पोलिसांनी प्रियाला तिच्या प्रियकरासह ७२ तासांत माथेरान येथून अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *