आधार नोंदणीचा कटू अनुभव आणि आधार सक्ती हा नेहमीच वादाचा मुद्दा असला तरी याच आधार कार्डमुळे एक गतिमंद मुलगी तीन वर्षांनी स्वगृही परतली. तीन वर्षांपासून धुळ्यातील संस्कार बालगृहात राहणाऱ्या झारखंडच्या गीताला तिचे कुटुंब मिळाले असून बुधवारी गीताला तिच्या भावाच्या स्वाधीन करण्यात आले. दीर्घ काळानंतर भाऊ-बहीण भेटत असल्याने त्यांना भावना अनावर झाल्या.
अहमदाबाद- हावडा एक्स्प्रेसमध्ये १३ जुलै २०१५ रोजी एका प्रवाशाला एक गतिमंद मुलगी मिळाली होती. जळगाव येथील एका संस्थेच्या मदतीने तिला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले. त्यावेळी तिने स्वत:चे नाव गीता किशन असे सांगितले होते. यानंतर बालकल्याण समितीमार्फत गीताला १४ जुलै रोजी धुळे शहरातील संस्कार बालगृहात दाखल करण्यात आले. गीताला मराठी भाषा व्यवस्थित कळत नव्हती. यामुळे तिची ओळख पटवण्यात अनेक अडचणी येत होत्या. वैद्यकीय तपासणीतही ती गतिमंद असल्याचे उघड झाल्याने बालगृहातील सदस्यांपुढे समस्या उभी राहिली. अखेर तिचे आधार कार्ड काढलेले असेल तर त्याची माहिती मिळवण्याचा निर्णय झाला. तिच्या हाताच्या अंगठ्यांचा ठसा त्यासाठी महत्वपूर्ण ठरला.
यानुसार आधार कार्डची प्रत काढण्यात आली. त्यात तिचे मूळ नाव सुशीला पिंगुवा क्रिश्ना चंपिला असे आले. ती मूळची झारखंडमधील कुमारडुंगी, पश्चिमी सिंहभूम येथील रहिवासी असल्याचे उघड झाले. यानंतर संस्कार बालगृहाचे संचालक सुनील वाघ यांनी पोलिसांच्या मदतीने झारखंड पोलिसांशी संपर्क साधला. तिचे पालक आदिवासी पाड्यातील रहिवासी असल्याने त्यांच्यापुढे आर्थिक अडचणी होत्या. यावरही पोलिसांच्या मदतीने तोडगा काढण्यात आला आणि बुधवारी गीताला तिच्या भावाच्या आणि झारखंड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
