ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांना त्यांच्या जयंतीनिमित्ताने गुगलने डुडलद्वारे अभिवादन केले आहे. या खास डुडलमध्ये बाबा आमटे यांनी केलेल्या समाजकार्याचा आढावा या डुडलमधून घेण्यात आला आहे.
मुरलीधर देवीदास आमटे म्हणजे बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी चंद्रपूरमध्ये आनंदवन आश्रम सुरू केला. गांधीवादी विचारांनी प्रेरीत असलेल्या बाबा आमटे यांनी समाजातून डावललेल्या कुष्ठरोगींची सेवा सुरू केली. श्रीमंत घराण्याची पार्श्वभूमी असलेल्या बाबा आमटे यांनी वयाच्या विशीतच वकिली व्यवसाय सुरू केला होता. मात्र, एका कुष्ठरोगीला पावसात भिजताना त्यांचे मन हेलावून गेले होते. त्यानंतर त्यांनी कुष्ठरोगींसाठी आयुष्य वाहून घेतले. बाबा आमटे यांनी सामाजिक चळवळीतही सक्रीय सहभाग नोंदवला होता. भारत जोडो आंदोलन, नर्मदा बचाव आंदोलनात त्यांचा सहभाग होता. त्याशिवाय वन्यजीव संरक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. बाबा आमटे यांना त्यांच्या सामाजिक कार्यासाठी विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

