मानखुर्दजवळ तांत्रिक बिघाड; हार्बर १५ मिनिटे उशिराने

मुंबईकरांच्या आठवड्याची सुरुवात लोकल हालाने झाली. मानखुर्द स्थानकाजवळ झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सकाळी गर्दीच्या वेळेस हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली. सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास हा बिघाड झाला होता. यामुळे मुंबईच्या दिशेने येणारी लोकल वाहतूक सुमारे १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होती.

सकाळीच तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मुंबईच्या दिशेने येणाऱ्या नोकरदार वर्गाचे हाल झाले. बिघाड झाल्याने वाशी व अन्य स्थानकात लोकल उभ्या होत्या. सुरुवातीला मध्य रेल्वेकडून बिघाडाबाबत कोणतीच उद्घोषणा न केल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आला असून लोकल वाहतूक पूर्वपदावर येत असून हार्बरवरील वाहतूक १० ते १५ मिनिटे उशिराने असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *