बाहेरगावी निघालेले मुंबईकर वाहतूककोंडीने हैराण

सुट्टी ‘एन्जॉय’ करण्यासाठी बाहेरगावी निघालेल्या मुंबईकरांच्या आनंदावर वाहतूककोंडीचे विरजण पडले आहे. दिवसाच्या वाहतूककोंडीतून सुटका मिळावी आणि प्रवासाचा ताण जाणवू नये, म्हणून बहुतांश मुंबईकर रात्रीच्या प्रवासास प्राधान्य देतात. यामुळे शुक्रवार रात्रीपासून मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे सह जुना एक्स्प्रेस वे, नाशिक महामार्ग, घोडबंदर रोड, गोवा आणि अहमदाबाद मार्गावरील प्रवाशांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.

मुंबईतील धावपळीच्या आयुष्यातून आणि वाहतूककोंडीतून क्षणभर सुटका व्हावी म्हणून सुट्ट्यांच्या काळात बाहेरगावी जाण्याकडे मुंबईकरांचा कल आहे. मात्र बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना महामार्गावर देखील वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. मुंबई-पुणे महामार्गावर अवजड वाहने, खासगी बस आणि अन्य वाहनांमुळे वाहतुकीचा वेगदेखील मंदावला होता. मुंबई-अहमदाबाद मार्गावर घोडबंदरलगत फाऊंटन पुलाचे काम सुरू आहे. पुलावरून एक दिशा बंद करून वाहने पाठवत असल्याने हा पूल पार करण्यासाठी सुमारे ३० ते ४५ मिनिटे लागतात. यामुळे महामार्गाचा वापर करून अहमदाबाद, सुरत, गुजरातला जाणाऱ्या मुंबईकर हैराण झाले आहेत.

महामार्गावर सुरू असलेल्या विकासकामांमुळे वाहनांच्या वेगाला ब्रेक लागल्याचे चित्र नाशिक आणि गोवा महामार्गांवर आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सुरू असल्याने कोकणात विशेषत: गोव्याकडे जाणाऱ्या प्रवाशांना कोंडीत अडकावे लागत होते. नाशिक महामार्गावर भिवंडी बायपाससह अन्य नाक्यांवर उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने या मार्गावरही वाहतूककोंडीचा सामना प्रवाशांना करावा लागत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *