विषाचा घास भरवून आई-वडिलांनी केली २ महिन्यांच्या चिमुकलीची हत्या

‘बेटी बचाव’साठी सरकारी पातळीवर मोहीम राबवली जात असतानाच समाजात अजूनही मुलगी नकोशीच असल्याचे दिसते. कोल्हापूरमध्ये दोन महिन्यांच्या चिमुकलीची आई- वडिलांनी हत्या केली असून जेवणात विष टाकून ते दोन महिन्यांच्या मुलीला दिल्याचे समोर आले आहे. प्रकाश पाडावे (वय २८) आणि जयश्री पाडावे (वय २१) अशी या माता- पित्यांची नावे आहेत.

शाहूवाडी तालुक्यातील सावर्डी गावात प्रकाश आणि जयश्री हे दाम्पत्य राहत असून या दाम्पत्याला प्रांजल (२ वर्ष) ही पहिली मुलगी आहे. या दाम्पत्याला दुसरीही मुलगीच झाली. त्यामुळे दुसऱ्या मुलीची या दाम्पत्याने हत्या करण्याचे ठरवले. त्यांनी ऑक्टोबरमध्ये जेवणात विष टाकून त्याचा घास मुलीला भरवला. विषप्रयोगामुळे चिमुरडीची प्रकृती खालावली. यानंतर दाम्पत्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, त्या मुलीचा मृत्यू झाला. संशय आल्याने डॉक्टरांनी शवविच्छेदनाचा निर्णय घेतला. चिमुरडीच्या व्हिसेराच्या तपासणीतून विषप्रयोग केल्याचे स्पष्ट झाले. दोन महिन्यांनी हा अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे.

अखेर पोलिसांनी संशयाच्या आधारे माता- पित्यांची चौकशी केली असता दुसरी मुलगी झाल्याने तिची हत्या केल्याचे सांगितले. पोलिसांनी निर्दयी आई-वडिलांना अटक केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *